नाल्यातील दूषित पाणी जलवाहिनीमधून जात होते घरोघरी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतीकडून देण्यात येणार्या पाण्यात जिवंत अळ्या आणि दूषित पाणी येत होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा करण्याचा इशारा दिला होता. याबाबत कृषीवलने आवाज उठवला होता. त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत तात्काळ उपाययोजना केली. त्यामुळे आता खांडा ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कृषीवलचे आभार मानले आहेत.
दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीकडून सर्व जलवाहिनी उघडून पाहिल्यानंतर नाल्यातील दूषित पाणी जलवाहिनीमध्ये जात असल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. सर्व अडचणी दूर करण्यात आल्यानंतर खांडा गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. खांडा गावामध्ये नेरळ नळपाणी योजनेचे सोडण्यात येणार्या पाण्यात जिवंत अळ्या येत होत्या.तसेच चार-पाच दिवस सातत्याने दूषित सांडपाणीमिश्रित पाणी येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. शेवटी स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर हजारे यांनी ग्रामपंचायतचे प्रशासक सुंजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांची ग्रामपंचायत कार्यालयात भेट घेऊन ग्रामस्थांची अडचण दूर करण्याची मागणी केली होती. अडचण दूर केली नाही तर खांडा ग्रामस्थ हंडा मोर्चा काढतील, असा इशारा दिला होता. त्यावेळी खांडा गावातील महिलांनी नळाद्वारे येणारे पाणी हे अत्यंत गढूळ येते आणि त्या पाण्याला सांडपाण्याची दुर्गंधी येते, त्याचवेळी त्या पाण्यात जिवंत अळ्या फिरत असल्याचे दिसून येत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यांनतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकाने खांडा गावात जाऊन त्या अशुद्ध पाण्याचे नमुने घेतले आणि अलिबाग येथे तपासणीसाठी पाठवले.
त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून नेरळ ग्रामपंचायतीमधील खांडा भागाला पाणीपुरवठा करणारे मुख्य जलकुंभ ते खांडा गाव या भागातील जलवाहिनी तपासण्याचे काम सुरू केले. त्यावेळी ग्रामपंचायतचे आरोग्य खात्याचे कर्मचारी यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थ मनोहर हजारे कायम सोबत होते. कोतवाल वाडीच्या बाजूने येणार्या नाल्याचे बाजूने मोहाची वाडी जलकुंभ येथून येणारी पाणी वाहून नेणारी जलवाहिनी होती आणि त्या जलवाहिनीमधून संपूर्ण खांडा गावाला अशुद्ध पाणी पोहोचत होते. गटाराचे सांडपाणी जलवाहिनीमधून जात होते आणि त्यामुळे गटाराचे पाण्यात असलेल्या अळ्या त्या जलवाहिनीमधून घरोघरी पोहोचत होत्या. मात्र, ग्रामपंचायत कर्मचार्यांनी तब्बल दोन दिवस त्या सर्व जलवाहिन्या उघडून त्यांची तपासणी केल्यावर ही समस्या आढळून आली. जलवाहिनी तपासणी करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारी सकाळी खांडा गावातील सर्व ग्रामस्थांच्या घरातील नळाला शुद्ध आणि चकचकीत पाणी आले आणि त्या सर्व ग्रामस्थांनी मनोहर हजारे यांच्या चिकाटीचे कौतुक केले.
आम्ही गावातील अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. खांडा गावात अशुद्ध दूषित पाणी नळाद्वारे जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर पाणीपुरवठा विभगाच्या कर्मचार्यांनी सर्व जलवाहिन्या खोलून समस्येचे मूळ शोधण्याचे काम केले आहे. त्यांनतर प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळू लागले आहे. बहुसंख्य जलवाहिन्या या जुन्या झाल्या आहेत. त्या बदलण्याची सूचना आम्ही सर्व ग्रामस्थांना करीत आहोत.
– सुजित धनगर, प्रशासक