। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर साठ्ये दि. 24 ते 28 एप्रिल या कालावधीत लंडन येथे तेथील (इंग्लंडमधील) वैद्यकीय विद्यार्थी व वैद्यकीय व्यावसायिकांना अॅडव्हान्स्ड ट्रॉमा लाईफ सपोर्ट याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी जात आहेत. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात-विशेषतः शल्यक्रिया क्षेत्रात नावाजलेल्या लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित अशा संस्थेने याबाबतचे निमंत्रण त्यांना दिले आहे.

अॅडव्हान्स्ड ट्रॉमा लाईफ सपोर्ट हा अपघातानंतर सुरुवातीच्या काळात (गोल्डन अवरमध्ये) अपघातग्रस्त रुग्णाची काळजी कशी घ्यावी, जेणेकरून त्याचा जीव वाचेल आणि त्याला कायमचे अपंगत्व येणार नाही, याविषयीचे डॉक्टरांना प्रशिक्षण देणारा अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्स या संस्थेचा अभ्यासक्रम आहे.
तो 82 देशांत शिकवला जातो. डॉ. साठ्ये या विषयाचे 2015 पासून मान्यताप्राप्त प्रशिक्षक आहेत. डॉ. साठ्ये यांनी दैनिक कृषीवल, इतर दैनिक व नियतकालिकांमध्ये वेळोवेळी वैद्यकीय आणि इतर विषयांवर उद्बोधक लिखाण केलेले आहे.