शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| खोपोली | प्रतिनिधी |
तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूर शहराच्या मुख्य ठिकाणी 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. फुलांची सजावट, आकर्षक रोषणाईत आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी दिग्गजांची मांदियाळी होती, तर माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, उपनगराध्यक्ष संतोष जंगम या दाम्पत्याच्या संकल्पनेतून खर्या अर्थाने दिमाखात पुतळा बसला असल्याचे कौतुक जयंत पाटील यांनी केले. घटना आणि कायद्यामुळे आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळाला आहे, तीच घटना बदलण्याचे काम होत असल्याची चिंता पाटील यांनी व्यक्त केली आहे.
खालापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, भन्ते महेंद्र बोधी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, वैद्यकीय अधिकारी अनिलकुमार शाह, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक, खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, केटीएसपी मंडळाचे संचालक कैलास गायकवाड, शेकापक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, शाम कांबळे, रवींद्र रोकडे, आरपीआय शहर अध्यक्ष नितीन वाघमारे, सरपंच अनिल चाळके, संतोष केदारी, पप्पू पाटील, गोपीनाथ सोनावणे, अविनाश वाघमारे, प्रमोद जाधव, निशात पाटील यांच्यासह दिग्गजांची मांदियाळी होती.
भन्ते महेंद्र बोधी यांनी बुध्दपूजा घेतल्यावर संतोष जंगम यांना पुतळा उभारण्यासाठी मदत करणारे जि.प. मा. उपाध्यक्ष सुधाकर घारे, आरपीआय पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक, खोपोली नगरपालिकेचे नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, केटीएसपी मंडळाचे संचालक कैलास गायकवाड, आरपीआय शहर अध्यक्ष नितीन वाघमारे यांचा सन्मान जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
खालापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष जंगम असताना खालापुरातील आरक्षित जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसविण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी काशिनाथ गायकवाड, सदाशिव कवडे यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली होती. त्यादरम्यान आ. जयंत पाटील यांनी स्वखर्चाने पुतळा बसविण्यासाठी सहकार्य केल्यामुळेच 13 एप्रिल 2011 मोठ्या दिमाखात पुतळ्याचे अनावरण केले होते. परंतु, सदरील पुतळा पंचधातुचा असल्यामुळे वातावरणचा परिणाम झाल्यामुळे पुतळ्याचा आकार बदलत चालला असल्याने पुन्हा नव्याने पुतळा बसविण्याचे आश्वासन आमचे नेते संतोष जंगम यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिले होते. आज ते स्वप्न साकार झाल्याचे माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी प्रास्ताविकातून सांगत पुतळा बसविण्यासाठी आर्थिक योगदान देणार्याचे आभार व्यक्त केले.
खालापूर शहरात पहिला पुतळा बसविण्यासाठी परवानगी नसताना मी तात्कालीन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची बोलून रात्रीत पुतळा बसविला नंतर सर्व परवानगी आणल्याची आठवण माजी आ. जयंत पाटील यांनी करून देत आज नव्याने बसविण्यात आलेल्या सुंदर पुतळ्याल्याचे कौतुक केले. आपण जे बोलतोय ते घटना आणि कायद्यामुळे, तीच घटना बदलण्याचे काम होतेय म्हणून तरूण पिढीने सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन पाटील यांनी केले. बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या कुटुंबाचे कौटुंबिक नाते होते. घटना लिहिताना विश्रांतीसाठी पेझारीला येत होते, यावेळी घटनेतील अनेक पाने आमच्या घरी लिहिली असल्याच्या आठवणी पाटील यांनी सांगितल्या. कुळ कायदा आंदोलनात अनेक केसेस झाल्या, त्या आंदोलनात आमचे आजोबा नाना पाटील यांच्यासोबत आंबेडकर होते. महाड सत्याग्रहसह अनेक आंदोलनात आंबेडकरांचे योगदान असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरूनाथ साठेलकर यांनी केले.