| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोलनाक्यावरील लांबच्या लांब रांगा टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी फास्टटॅग पद्धतदेखील अनिवार्य केली. मात्र, आता फास्टटॅगकरिता टोलनाक्यावरही गाड्यांना रांगेत उभं राहावं लागत आहे. त्यामुळे आता टोलनाकेच बंद व्हावेत यासाठी केंद्र सरकार नवीन उपाययोजना करणार आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
देशात लवकरच टोलसाठी एक नवीन धोरण लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या 10-15 दिवसात हे धोरण लागू होईल. काही दिवसांत संपूर्ण देशभरातील सर्व टोल प्लाझा हटवले जातील, असे गडकरी म्हणाले. टोलनाक्याबद्दल नितीन गडकरी म्हणाले की, येत्या 15 दिवसांत अशी पॉलिसी आणणार आहे की टोलबद्दल तुमची कोणतीही समस्या असणार नाही. पण हे महाराष्ट्रातील टोलबद्दल नसून राष्ट्रीय महामार्गाबद्दल असणार आहे. त्याचप्रमाणे सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करणार आहे. यामुळे टोलनाके राहणार नाहीत आणि तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेर्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार, अशी माहिती त्यांनी दिली.
नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर सॅटेलाईट ट्रॅकिंगनुसार आपोआप टोल कापला जाईल. सॅटेलाईट ट्रॅकिंगच्या माध्यमातून गाडीच्या क्रमांकाची ओळख पटवली जाईल, त्यानंतर हा टोल आपोआप कट होईल. पुढील 10 ते 15 दिवसांत देशात नवीन टोल धोरण लागू होईल.
नितीन गडकरी,
केंद्रीय मंत्री
फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल
एक एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला. तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील. टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.