अलिबागमधील अनिल फुटाणे यांच्या दवाखान्यातील घटना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पितृत्वाच्या आनंदाच्या क्षणीच पत्नीविरहाच्या दुःखाचा आघात सहन करावा लागल्याची हृदयस्पर्शी घटना अलिबागमध्ये सोमवारी (दि.14) घडली. 2 किलो 800 ग्रॅम वजनाच्या चिमुकल्याला जन्म दिल्यानंतर संपूर्ण थळे कुटुंबिय आनंदात होते. सुचितादेखील मातृत्वाचा आनंद घेत होती. पण अचानक तिचा घसा कोरडा पडायला लागला, श्वासोच्छ्वास घेणे कठीण जात होते. नातेवाईक भांबावून गेले होते. डॉक्टर, नर्सकडे अपेक्षेने बघत होते, त्यांना रुग्णाकडे लक्ष देण्यासाठी जीवाचा आकांत करीत होते. मात्र, डॉक्टरांनी तसेच नर्सने त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. वेळ नव्हती, पण काळ आला होता. ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर ती अपयशी ठरली. तिच्यासाठी मातृत्वाचा आनंद हा क्षणिक ठरला. या घटनेमुळे केवळ घोटवडेच नाही तर संपूर्ण तालुका हादरला. बाळाचा जन्म कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरला असताना, तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिष्का भिसे प्रकरण राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणाबाबत शासन काय भूमिका घेणार याबाबत निरनिराळी चर्चा सुरु असतानाच खासगी दवाखान्यातील डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे घोटवडे येथील प्रसूत महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ही घटना अलिबागमधील फुटाणे यांच्या दवाखान्यात घडली. तेथील डॉक्टर व नर्सनी वेळेवर उपचार केले नसल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रसूतीदरम्यान होणार्या महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात अलीकडे वाढ होत असून, या घटनेनंतर खासगी दवाखान्यांवर आरोग्य विभागाचा अंकुश राहिला नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुचिता सुशील थळे (29) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. नियमित तपासणीसाठी त्यांना सोमवारी (दि.14) अलिबागमधील फुटाणे यांच्या दवाखान्यात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आणले होते. तपासणी केल्यावर त्यांच्या गर्भातील पाणी कमी झाले आहे. शस्त्रक्रिया करून प्रसूती करावी लागेल, असे फुटाणे यांनी सांगितले. त्यानुसार सुचिता यांना उपचारासाठी दाखल केले. शस्त्रक्रियेनंतर (सिझर) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रसूती झाली. त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, मध्यरात्रीपासून सुचिता यांची प्रकृती बिघडू लागली. तेथील नर्सकडून सहकार्य मिळत नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. अखेर मंगळवारी (दि.15) सकाळी नर्सने डॉ. फुटाणे यांना बोलावले. त्यांनी उपचार सुरु केले. परंतु, उपचाराची साधने पुरेसी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात सुचिता यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, काही तासातच त्यांचा मृत्यू झाला.
सुचिता यांच्या प्रकृतीकडे डॉ. अनिल फुटाणे तसेच रात्रपाळीला असलेल्या नर्सने व्यवस्थित लक्ष दिले नाही. तिच्यावर वेळीच योग्य ते उपचार केले नाही. रुग्णालयामध्ये योग्य उपचार सामुग्री उपलब्ध नसल्याने मृत्यू झाला आहे, असा आरोप सुशील थळे यांनी केला आहे. डॉ. फुटाणे आणि नर्स हे दोघे सुचिता यांच्या मृत्यूस कारणीभूत असून, त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत पाटील यांना मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी निवेदन दिले आहे. योग्य ती समिती गठीत करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून स्पष्ट केली आहे. राज्यामध्ये दीनानाथ मंगेशकर दवाखान्यातील तनिष्का भिसे या महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळ झाल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना ताजी असताना अलिबागमधील एका खासगी दवाखान्यातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे विवाहित महिलेला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेची योग्य ती चौकशी केली जावी, अशी मागणी होत आहे.
डॉ. अनिल फुटाणे अडचणीत?
अलिबागमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल फुटाणे यांचा खासगी दवाखाना आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा केली आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूला फुटाणे जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. समिती गठीत करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे डॉ. फुटाणे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुचिता थळे या महिलेची प्रसूती सिझर करून सोमवारी दुपारी करण्यात आली. त्यावेळी महिलेची प्रकृती चांगली होती. सायंकाळी चार ते पाच तसेच रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळीदेखील प्रकृती चांगली होती. मात्र, दुसर्या दिवशी सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. अनिल फुटाणे
स्त्रीरोग तज्ञ
अलिबागमधील डॉ. फुटाणे यांच्या दवाखान्यात प्रसूती झालेल्या महिलेची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डॉ. शशिकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक
सुचिता थळे या महिलेवर अलिबागमधील फुटाणे यांच्या दवाखान्यात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली जाणार आहे. पोलीस तपासानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
किशोर साळे,
पोलीस निरीक्षक, अलिबाग