रायगडात बहरणार ड्रॅगनफ्रूटची शेती

फलोत्पादन योजनेंतर्गत मिळणार लागवडीसाठी सुविधा
अधिकाधिक शेतकर्‍यांनी अर्ज करावेत
जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले यांचे आवाहन
मुरूड जंजिरा | वार्ताहर |
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी येथील शेतीला; पर्यायाने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे मेहनतही वाया जात आहे. याचाच विचार करुन कमी श्रमात अधिक उत्पादन देणार्‍या ड्रॅगन फ्रूटची लागवड शेतकर्‍यांनी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
‘ड्रॅगन फ्रुट’ हे फळपीक अत्यंत कमी पाण्यावर पिकते. खाण्यासाठी पौष्टिक असल्यामुळे या फळाला जगाच्या बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी ड्रॅगन फ्रुट हे फळपीक ‘आर्थिक वरदान’ ठरणारे असल्यामुळे शेतकर्‍यांनी हे फळपीक घेण्याचे आवाहन बाणखेले यांनी केले. फलोत्पादन योजनेंतर्गत ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
ड्रॅगनफ्रूट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्व आणि अ‍ॅन्टीऑक्सीडेन्टमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. याव्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली, तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व किडीचा प्रादूर्भाव नगण्य असून, पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी निर्यात क्षमता, औषधी व पोषक मूल्य इ. बाबी लक्षात घेऊन सन 2021-22 या वर्षापासून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आलेले आहे.
लागवड कशी करावी?
ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मी. ु 3 मी. ु 25 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्डयाच्या मधोमध सिमेंट काँक्रिटचा किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर काँक्रिटची फ्रेम बसविण्यात यावी. या सिमेंट काँक्रीट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

अनुदान किती?
ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहित्य, आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व पिक संरक्षण याकरीता अनुदान देय आहे. याकरीता रक्कम रू. 4.00 लाख प्रकल्प मूल्य ग्राह्य धरून 40 टक्के प्रमाणे रक्कम रु 1 लाख 60 हजार इतके अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुसर्‍या वर्षी 75 टक्के व तिसर्‍या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य आहे.

ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी अधिकाधिक शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, तसेच अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
उज्ज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक

Exit mobile version