तुम्ही पिताय ते पाणी फिल्टरचे की विहिरीचे?
| पेण | प्रतिनिधी |
जिल्ह्यात खेडेगाव असो वा शहर, जवळपास प्रत्येक घरात आता जारचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे पाणी व्यावसायिकांना आर्थिक लाभ होत असला तरी आणलेले पाणी शुध्द आहे की नाही हे पाहणे ही तितकेच गरजेचे आहे.
पेणमध्ये पाणी व्यावसायिकांकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता सिडकोच्या लाईनमधून, भोगावती नदीतून, विहिरीतून आणलेले पाणी शुध्द करून ते जारमध्ये भरले जाते. व्यावसायिक हे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन पाणी देत आहेत. असे वाटत असतानाच पेणमध्ये आलेली काविळची साथ आजही कमी होताना दिसत नाही. पाण्याची तपासणी ही सहा महिन्यांनी करणे गरजेचे आहे.
दरम्यान, दि. 29 एप्रिल 2024 च्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अपर्णा खेडेकर यांच्या अहवालानुसार पेणमधील श्री. कृपा एंटरप्रायझेस कामार्ली आणि अल्कलाईन ड्रि कींग पॅकिज्ड वॉटर, अंतोरा रोड आईस फॅक्टरी जवळ हे दोन्ही विक्रेत्यांचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे जिल्हा प्रयोगशाळा अलिबाग यांनी नमूद केले आहे. असे असतानादेखील दोन्ही ठिकाणी पाणी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक पहायला मिळतात आणि या पाण्याच्या दूषितीकरणामुळेच साथीचे आजार डोके वर काढू शकतात.
डॉ. अपर्णा खेडेकर यांनी वरील दोघांविरूध्द कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कोणतीच हालचाल होताना पाहायला मिळत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी पेण तालुक्यात काविळसारख्या साथीचे आजार वाढण्याची वाट तर पाहात नाहीत ना, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
एक जार 70 रूपयांना बिसलेरी पाण्याची एक लीटरची बाटली ही 20 रुपयाला मिळते. मात्र, पाण्याचा 20 लीटरचा एक जार हा 70 रुपयात मिळत आहे. जार हा घरपोच मिळत असल्याने तो फायदेशीर ठरत आहे.
शहरात घराघरात जार शहरामधील कार्यालये, घरात जारच्या पाण्याचा वापर अधिक वाढला आहे. जारद्वारे थंडगार पाणी मिळत असल्याने त्याचा वापर हा घराघरात, कार्यालयात होऊ लागला आहे.
पाण्यावर कमावतात पाण्यासारखा पैसा पाणी ही नितांत गरज आहे. अनेक भागात पाणीटंचाई आहे. त्याचबरोबर सणवार, समारंभ असले की जास्तीचे पाणी लागते. त्यामुळे जारचे आणि बुचबंद बाटल्यांचे पाणी मागविले जाते. त्यामुळे व्यावसायिक पाण्यावर पैसा कमावत आहेत.
जार व्यवसायावर कंट्रोल कुणाचा? जारद्वारे मिळणारे पाणी हे शुध्द असणे आवश्यक आहे. याबाबत पाणी पुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. मात्र, असे नियंत्रण या व्यवसायावर आहे की नाही, हा ही एक प्रश्न आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या पाणी व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाकडून रितसर परवाना घ्यावा लागतो. परंतु, अशा प्रकारचा परवाना कित्येकांजवळ नाहीच. जारद्वारे येणारे पाणी हे संबंधित विभागाकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते. व्यावसायिकांनी हे दर सहा महिन्यांनी पाण्याची तपासणी संबंधित विभागाकडून करून घेणे आवश्यक असते. विहीर आणि बोअरिंगचे जारद्वारे पाणी देणाऱ्या व्यावसायिकांनी पाण्याची तपासणी करणे आवश्यक असते. परंतु किती जण तपासणी करतात, हा ही एक मोठा संशोधनाचा विषय आहे.