पिण्यासाठी डवर्याचे पाणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या माणगाव वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. माथेरानकडे जाणार्या जलवाहिनीमधून पिण्याचे पाणी मिळत असते. मात्र माथेरान येथे जाणार्या जलवाहिनीमधून पाणी पुरवठा होत नसल्याने माणगाववाडीमधील ग्रामस्थांचे तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, या ग्रामस्थांना सध्या डवर्याचे पाणी हंड्यात साठवून आणावे लागत असून माणगाव वाडीमध्ये 60 घरांची वस्ती आहे.
नेरळ-माथेरान घाट रस्त्यात माणगाव वाडी ही आदिवासी वाडी असून माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतमधील भाग आहे. या गाडीच्या बाजूने माथेरान या शहरासाठी जाणारी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. स्थानिक आदिवासी लोकांनी जलवाहिनी टाकण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या आणि त्याबदल्यात वाडीमधील 60 घरांसाठी पिण्याच्या पाण्याची तरतूद करून घेतली. त्या जलवाहिनीमधून या आदीवासी वाड्यांना पाणी पुरवठा होतो. प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. तर वाडीमध्ये पाणी पुरवठ्यासाठी एक विहीरदेखील असून त्या विहिरीचे पाणीदेखील ग्रामस्थ वापरतात. मात्र गेल्या 15 दिवसांपासून केवळ दोनच दिवस माणगाव वाडीमधील नळाला पाणी आले आहे. माथेरानला जाणार्या नळपाणी योजनेचे उल्हास नदी येथून माथेरानकडे जाणारी पाणी पुरवठा यंत्रणा मागील 15 दिवसांपासून बंद आहे. त्यात केवळ दोनवेळा नळाला पाणी आले असल्याने माणगाव वाडीमधील ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
नळाला पाणी येत नसल्याने शेवटी ग्रामस्थ डोक्यावर हंडे घेवून माथेरान घाट रस्त्यावर चालत येतात. त्या ठिकाणी श्री गणेश मंदिराच्या मागे एक झरा असून त्या झर्यामध्ये साचणारे पाणी येथील आदिवासी महिला साठवून घरी घेवून पिण्याच्या पाण्याची तहान भागवत आहेत. त्या पाण्याच्या झर्यामधून फार कमी प्रमाणात पाणी मिळत असून स्थानिक महिलांना दोन हांडे भरून घेण्यासाठी तासभर थांबून राहावे लागते. तर त्या ठिकाणी परिसरातील गुरेदेखील पाणी पिण्यासाठी येत असल्याने स्थानिक महिला आधी गुरांसाठी पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न करतात.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय
माणगाव वाडीमध्ये शासनाची विनाअनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहे. या शाळेत माथेरान नळपाणी योजनेच्या जलवाहिनीमधून पाणी दिले आहे. मागील काही दिवस माथेरानकडे जाणार्या जलवाहिनीमधून पाणी पुढे जात नसल्याने आश्रमशाळेतील शिकणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तेथील प्रशासन टँकर मागवून पाण्याची सोय करीत आहेत.
ग्रामपंचायतकडून माणगाव वाडीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना करण्याची गरज आहे. त्यात उन्हाळयात माथेरान येथे असलेल्या पर्यटन हंगामातदेखील माणगाव वाडीमधील लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. शासनाने जलजीवन मिशनमधून स्वतंत्र नळपाणी योजना करुन स्थानिक ग्रामस्थ आणि आश्रमशाळा यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढावा.
– जैतू पारधी, माजी सदस्य, माणगाव ग्रामपंचायत







