घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जवळच अवाढव्य होर्डींग बेकायदेशीररित्या उभारण्यात आले आहे. 60 फुटी लोखंडी होर्डींग गेल्या दोन महिन्यांपासून उभे आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या होर्डींगमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील काही महिन्यापूर्वी घाटकोपर येथे होर्डींग कोसळून मोठी दुर्देवी घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती होण्याची भिती काँग्रेसचे शहरप्रमुख समीर ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. लाखो पर्यटक वर्षाला भेटी देऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटतात. समुद्रकिनार्यापासून काही अंतरावर जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्याजवळच प्रवेशद्वारासमोर एक भले मोठे होर्डींग निवडणूकीच्या अगोदर उभारण्यात आले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीचे फलक लावले होते. गेली अनेक दिवस त्या फलकांवर शासकिय जाहीरात लावण्यात आली होती.
आचारसंहितेच्या कालावधीत होर्डींगवरील फलक काढण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून लोखंडी होर्डींग उभे आहे. या ठिकाणी पर्यटकांसह स्थानिकांची कायमच वर्दळ असते. त्यात नववर्षाच्या स्वागतासाठी हा परिसर पर्यटकांनी गजबजण्याची शक्यता आहे. त्यामुळे होर्डींगमुळे अनुचित घटना घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अवाढव्य होर्डींग कोसळल्यामुळे गेल्या मे महिन्यात घाटकोपर येथे 16 नागरिकांचा बळी गेला. अलिबाग शहरात उभ्या असलेल्या होर्डींगबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे विचारणा केली, असता होर्डींगसंदर्भात परवानगी मागणारा अर्ज आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.नगरपालिका प्रशासनाने होर्डींग सबंधीत कंत्राटदाराकडून त्वरीत काढून टाकावे, बेकायदा होर्डींग लावल्याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.