| रोहा/धाटाव | प्रतिनिधी |
रोहा- कोलाड रस्त्यावर भरदिवसा एका अज्ञात टँकर चालकाने आरोग्यास घातक असलेले रसायन टँकर रस्त्यालगत उभे करून रसायन नजिकच्या कुंडलिका नदीपात्रात सोडले आहे. दरम्यान यातील काही रसायन हे रस्त्यावरच पडले असल्याने रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या वाहनचालकांसह पादचारी वर्गाला याचा प्रचंड त्रास जाणवत आहे. दिवसा ढवळ्या रस्त्यालगत कुंडलिका नदी पात्रात टँकर मधील रसायन सोडल्याच्या घटनेने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र, या घटनेचा तपास कोलाड पोलीस करीत आहेत.
रोहा- कोलाड रस्त्यावर अशोकनगर आणि पालेखुर्द गावच्या हद्दीत बुधवारी (दि.24) दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात टँकर चालकाने आरोग्यास घातक असलेले रसायन रस्त्यालगत टँकर उभे करून कुंडलिका नदीपात्रात सोडून कोलाड दिशेने पलायन केले. टँकर रिकामे करीत असताना चालकाकडून घाई गडबडीत हे रसायन रस्त्यालगत सुद्धा सांडले असल्याचे दिसून आले. काळ्या रंगाच्या रसायनामुळे रस्त्यावरील वाहन चालकांना, पादचारी वर्गाला डोळे चुरचिरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यातच एका महिलेच्या अंगावरही हे रसायन पडल्याने या महिलेला रोह्यातील खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रोह्यातील सह्याद्री वन्यजीव प्राणी संरक्षणार्थ संस्थेचे सदस्य प्रणय शिंदे आणि शरद दिसले यांच्या प्रथमदर्शी निदर्शनास येताच त्यांनी संबंधित टँकरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकर चालकाने तोवर पलायन केले होते. दोघांनीही या घटनेबाबत कोलाड पोलिसांना कळविले. संबंधित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कोलाड पोलिसांनी टँकर चालकाबाबत शोध मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान गुजरात, पुणे, चिपळूण येथून धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये रसायने घेऊन आलेले टँकर हे रसायने कुंडलिका नदीपात्रात सोडतात कसे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचेही सर्वत्र बोलले जात आहे. मात्र, आज घडलेल्या या घटनेकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित टँकर चालकाने नदी पात्रात रसायन सोडून रसायन रस्त्यावर इतरत्र पडल्याचे पहावयास मिळाले. संबंधित टँकर कोलाड बाजूकडून येऊन कुंडलिका नदी पात्रात रिकामा करून गेल्याचा अंदाज आहे. इतर ठिकाणाहून येऊन कुंडलिका नदी पात्रात रसायने रिकाम्या करणाऱ्या टँकरचालक, मालक यांच्यावर कारवाई करावी, असे पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठांना आम्ही कळविले आहे.
दयानंद नांदगावकर
कार्यकारी व्यवस्थापक
रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन







