। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील सुकेळी खिंडीत तीव्र उतारावर ट्रेलर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात रविवारी (दि. 16) सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास झाला असून घटनेतील ट्रेलर गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जात होता. दरम्यान, सुकेळी खिंडीत तीव्र उतारावर चालकाचा ट्रेलरवरील ताबा सुटल्यामुळे ट्रेलर डिवाडरला धडकून पलटी झाला.
या अपघातात ट्रेलरचालक नितीन कुमार यादव (वय 25, रा. लखनो, उत्तरप्रदेश) हा केबिनमध्ये अडकून त्याच्या पायाला हाताला गंभीर दुखपत झाली. त्याला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून उपचारासाठी जिंदाल हॉस्पिटल सुकेळी येथे हलविण्यात आले. याबाबत अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि जी.बी.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार करीत आहेत.