कामगारांकडून स्थानिकांना मारण्याची धमकी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आरएमसी प्लांट नागरिकांसह महिला, लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असून, तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही मंडळींनी केला आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता या प्रकल्पाचे काम सुरू असताना, हा प्रकल्प आता पुन्हा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. आरएमसी प्रकल्पाविरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याचा राग धरून तेथील एका कामगाराने स्थानिकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी लागणार्या सिमेंटचे उत्पादन करणारा कारखाना कावीर गावानजीक अलिबाग-वावे रस्त्यालगत उभारला जाणार आहे. चेन्नई येथील आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीमार्फत ते काम केले जाणार आहे. मात्र, कावीर परिसर कृषी व रहिवासी क्षेत्राचा असल्याने औद्योगिक प्रकल्प उभारणे बेकायदेशीर असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांनी केला होता. याबाबत त्यांनी तहसीलदारांपासून जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पुन्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तक्रार अर्ज केला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मंडळ अधिकार्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील पाहणी करून पंचनामे केले. मात्र, जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेता या प्रकल्पाचे काम सुरू आहे. शेतजमिनीमध्ये काम करताना जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असतानादेखील तेथील ठेकेदार मनमानी कारभाराने काम करीत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.
आरएमसी प्लांटचे काम अनधिकृत असल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवला जात असताना हा प्रकल्प आता पुन्हा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका शेतकर्याने आरएमसी प्लांट धोकादायक असून, प्रदूषणामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती असल्याची तक्रार कावीर ग्रामपंचायतीकडे केली होती. त्याबाबत राग धरून तेथील प्लांटमधील कामगारांनी तक्रारदाराला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात त्या कंपनीतील कामगाराविरोधात तक्रार करण्यात आली आहे. प्रकल्पातील कामगारांसह ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे तसेच गुंडगिरीमुळे स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र या घटनेतून पहावयास मिळत आहे. याकडे पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महसूल विभागाला उशिरा जाग
कावीर येथील आरएमसी प्लांट वादग्रस्त ठरत आहे. हा प्लांट सुरू करण्याआधी येथील गट नं./स.नं गट नं/स.नं 13, 14, 17/1 व 17 /2 या मिळकतीमध्ये सक्षम प्राधिकार्यांची पूर्वपरवानगी न घेता औद्योगिक प्रकल्पाचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्याचे मंडळ अधिकार्यांनी अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना यांच्या तरतुदींचा भंग झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यानुसार हे बांधकाम अनधिकृत ठरविण्यात आले असून, ते तात्काळ थांबविण्याचे आदेश तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिले आहेत. तसेच बांधकाम न थांबविल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कावीर येथील आरएमसी प्लांट बंद करण्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रकल्प व सभोवतालच्या परिसराची संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. दरम्यान, आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने जल आणि हवा कायद्यांतर्गत प्रस्तावित निर्देश पारित करण्यात आलेले आहेत.
रा.सं. कामत,
उपप्रादेशिक अधिकारी, रायगड-2, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
अर्जदार यांनी केलेल्या तक्रारीच्या रागातून धमकी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल ठाणे अंमलदारामार्फत दाखल केला जातो. त्याबाबत पुढील कार्यवाही काय केली. याची पडताळणी करून माहिती देण्यात येईल.
किशोर साळे,
पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे