गांधारी, सावित्रीमध्ये दिवसाढवळ्या बेकायदा वाळूउपसा
| महाड | उदय सावंत |
वाळूउपसा करण्यास असलेली बंदी झुगारुन महाड शहराजवळ महामार्गालगत असलेल्या गांधारी आणि सावित्री नदीच्या पात्रात काही दिवसांपासून दिवसाढवळ्या दररोज शेकडो ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. या गंभीर बाबीकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहेत. जेसीबीच्या सहाय्याने बेधडकपणे गांधारी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा वाळूउपसा करण्यात येत आहे. वाळूउपसा करणारे सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंतिध असून, राजकीय वरदहस्तामुळे या वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे धाडस महसूल विभागाकडून होत नसल्याची परिसरात चर्चा आहे. यामुळे शासनाचा महसूल नक्की कोण बुडवतोय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
एकीकडे शिमगोत्सवाची चाकरमान्यांची धावपळ, तर दुसरीकडे गांधारी, सावित्री नदी पात्रातील वाळू-रेजगा उपासाची चढाओढ सुरू आहे. मात्र, महाड तालुक्यातील अनधिकृत वाळू उपशावर स्थानिक महसूल विभागाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. गांधारी नदी, सावित्री नदी पात्रामध्ये वाळूउपसा करण्याची कोणतेही परवानगी नसताना वारेमाप वाळू उत्खनन केले जात आहे. तर, स्थानिक तलाठी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने वाळण, भावे, बिरवाडी, गांधारी नदी पात्राच्या परिसरात अनधिकृतपणे वाळूचे मोठे उत्खनन केले जात आहे. जलसंपदा विभागाचे नियम पायदळी तुडवत या विभागात नदीमध्ये जेसीबी लावून उत्खनन केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात उपसा केलेली वाळू काही अंतरावर असलेल्या खासगी जागेत ठेवण्यात येत आहे. बंदी असतानाही गांधारी, सावित्री नदीलपात्रात बेसुमारपणे होत असलेल्या हा वाळूउपसा त्वरित थांबवून वाळूमाफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दहशतीच्या बळावर दिवसरात्र हा वाळूउपसा सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. जेसीबीच्या सहाय्याने उपसा केलेल्या वाळूची ट्रॅक्टरच्या माध्यमाधून वाहतूक करुन काही अंतरावर असलेल्या खासगी जागेत साठवणूक करण्यात येत आहे. यावर ठोस कारवाई होत नसल्याने वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे. वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस कारवाईची गरज असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
रॉयल्टी बुडवून वारेमाप उपसा
कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे दिसून येत असतानाही महसूलच विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत. या वाळूतस्करांवर कारवाई करुन बेकायदेशीर उपसा केलेले वाळूचे साठे तसेच यंत्रसामुग्री महसूल विभाग जप्त करण्याची धमक दाखवेल काय? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत महसूल आणि जलसंपदा विभागाचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट होत आहे. तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यांच्या बाबतीत संशय व्यक्त होत आहे. यामुळे नदीपात्रात व वाळू-रेजगा उपसणार्या ठेकेदारांचा सुळसुळाट वाढला आहे.
याबाबतची माहिती माझ्या कानावर आहे. घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. अवैध रेती उत्खनन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल.
सागर पवार,
तलाठी, महाड
दिवसाढवळ्या रेती उत्खनन होत असल्याची माहिती कृषीवल प्रतिनिधीमार्फतच मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन रेतीमाफियांवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात येत आहेत. या रेतीमाफियांना महसूल विभागातील कोणी अधिकारी जाणीवपूर्वक सहकार्य करीत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
महेश शितोळे,
तहसीलदार, महाड