| माणगाव | वार्ताहर |
होळी व धुळवड सणांसाठी मुंबई, पुणे, ठाणे, गुजरात येथील चाकरमानी कोकणातील मूळ गावी कुटुंबासमवेत मोठ्या संख्येने आले होते. त्यातच शनिवार व रविवार हे दोन दिवस सुट्टीचे असल्याने पुणे व अन्य शहरातून पर्यटकही मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांनी आपला आता परतीचा प्रवास सुरू केल्यामुळे माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडी सकाळपासूनच झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस व माणगाव पोलीस ठिकठिकाणी प्रयत्न करीत होते.
दरम्यानच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर महाड बाजूकडून माणगावकडे जाणार्या तसेच श्रीवर्धनकडून माणगावकडे येणार्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोडीचा फटका होळी सणावून परत निघालेल्या चाकरमानी तसेच पर्यटकांनाही मोठ्या प्रमाणात बसला असून महामार्गावर तासंतास रखडपट्टी झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठ व इंदापूर बाजारपेठेतील बायपासचे काम अपूर्ण असल्याने प्रवासी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाली होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.