| पनवेल | वार्ताहर |
वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहन चालकांवर लक्ष ठेवून दंड आकरण्यासाठी कामोठे येथील विष्टा कॉर्नर या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यातून करण्यात आलेल्या कारवाईत वर्षभरात करोडो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेश खरात यांनी वापरलेल्या माहितीचा अधिकारातून समोर आली असून, 1 मार्च 2024 ते 24 मार्च 2025 या वर्षात सीसीटीव्हीमार्फत करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास 2 कोटी 14 लाख 95 हजार 700 रुपयांचा दंड वाहतूक विभागाकडून वसूल करण्यात आला आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे, चारचाकी चालवताना शीट बेल्ट न लावणे तसेच प्रवासी वाहतूक करताना अतिरिक्त प्रवासी बसवणार्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाकडून शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कामोठे वसाहतीमधून खान्देश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या विष्टा कॉर्नर या चौकातदेखील असे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून, सीसीटीव्हीची माहिती नसल्याने वाहतुकीचे नियम मोडणार्यांना मोठ्या आर्थिक दंडाचा सामना करावा लागत आहे.
विष्टा कॉर्नर येथे वर्षाभरात करण्यात आलेल्या कारवाईत दुचाकीस्वारांकडून सर्वात जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. 16 हजार 303 दुचाकीस्वारांवर दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे मोबाईलवर बोलणे याबद्दल करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास 1 कोटी 48 लाख 72 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सीट बेल्ट न लावणे मोबाईलवर बोलणे याकरिता 8 हजार 9 चार चाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून 65 लाख 82 हजार 500 रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर प्रवासी वाहतूक करणार्या 206 तीनचाकी वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईतून 41 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.