। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल जवळील तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात 1 कोटी 2 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांचे पथकाला गुप्त माहितीदारामार्फत “महावीर मॅजेस्टी, घोट कॅम्प, तळोजा येथे सुरींदर सिंग उर्फ काळु तसेच त्याचा भाऊ मनिंदर सिंग असे हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करतात व त्यांचे राहते घरी त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करून ठेवला आहे” अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. याबाबत खात्री करून कारवाई केली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पिवळसर रंगाचे खडे असलेले हेरॉईन तसेच तपकिरी रंगाची अफू पावडर प्लास्टिक पिशव्यांमध्ये आढळून आली. तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतर 118 ग्रॅम वजनाचे हेरॉईन आणि 143.6 ग्रॅम वजनाची अफू पावडर जप्त करण्यात आली. या अमली पदार्थांची एकूण बाजारभावानुसार किंमत 1 कोटी 2 लाख 8 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासोबतच चार वजनकाटे, दहा इंजेक्शन तसेच सुमारे दीडशे प्लास्टिक पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात 24 वर्षीय सुरींदर गुरजंत सिंग उर्फ काळू आणि 27 वर्षीय मनिंदर गुरजंत सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरींदर आणि मनिंदर हे यापूर्वी कळंबोली वसाहतीमध्ये राहत होते. दरम्यान, हा अमली पदार्थ पंजाब येथून आणणारा ट्रक चालक फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. सदरचे कारवाई मध्ये सहा. पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, अति. कार्यभार, आर्थिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सपोनि तुषार माने, पोहवा तायडे, पोहवा मेहेतर, मपोना पाटील, पोशि पालवे, चालक पोशि भाबड हे सहभागी होते.
तळोजा परिसरातून कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक
