शेतकर्‍यांना अनुदानावर ड्रम सिडर यंत्र

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
शेतकर्‍यांना अनुदानावर ड्रम सिडर यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती सुधागड तालुका कृषी अधिकारी झगडे यांनी दिली. कृषी संजीवनी सप्ताह जिल्हाभर राबविण्यात येत असून, त्यादरम्यान शेतकर्‍यांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.
कृषी संजीवनी सप्ताहात शेतकर्‍यांना भातलागवडीच्या आधुनिक पद्धती, जमीन आरोग्यपत्रिका आधारित खतांचा वापर, 10 टक्के रासायनिक खतांची बचत, कीडरोग संरक्षण, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, भातपीक विमा, शेती शाळा आणि कृषीविषयक योजना यांची माहिती क्षेत्रीय भेट, प्रशिक्षण, प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेचे ई-केवायसी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे. याबरोबरच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भातपीक लागवड व दर्जा सुधारणा कार्यक्रमांतर्गत तालुक्यात हस्तचलीत ड्रम सिडर यंत्राद्वारे भात लागवडीची प्रात्यक्षिके तालुका कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आली आहेत.
या योजनेंतर्गत भात लागवडीच्या प्रात्यक्षिकांसाठी हस्तचलित ड्रम सिडर यंत्र, तणनाशक, युरिया-डिएपी ब्रिकेट्स, मनुष्यबळ विकास अंतर्गत प्रशिक्षण, माती नमुने काढणे या बाबींचा समावेश आहे. ड्रम सिडर यंत्राची किंमत रुपये 7200 अधिक कर इतकी असून, जे शेतकरी ड्रम सिडर यंत्राद्वारे भातलागवड करण्यास इच्छुक आहेत, त्यांना ड्रम सिडर यंत्र खरेदी करण्यासाठी रु. 2334 इतके अनुदान देण्यात येणार आहे. ड्रम सिडर यंत्राची खरेदी शेतकर्‍याने स्वत: करावायाची असून, खरेदीचे बिल सादर केल्यावर अनुदान देण्यात येईल. तरी इच्छुक शेतकर्‍यांनी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जे काही मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे, त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुधागड जे.बी. झगडे यांनी केले आहे.

Exit mobile version