| पनवेल | वार्ताहर |
यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद पनवेलमध्ये झाल्यामुळे येथील कर्नाळा पक्षी अभयारण्यात एप्रिल महिन्यात पर्यटकांची संख्या 25 टक्केच नोंदविली गेली आहे. 44 अंश सेल्सिअसच्या तापमानामुळे मागील वर्षीपेक्षा साडेचार हजार पर्यटक एप्रिल महिन्यात कमी आल्याची नोंद वन विभागाकडे नोंदविली गेल्याने मे महिन्यात उन्हाचा पारा कमी असल्यास पर्यटकांना कर्नाळा किल्ला आणि येथील पक्षी अभयारण्यात भटकंती करता येईल.
दीडशेहून अधिक पक्षी, दुर्मीळ वृक्ष, प्राण्यांचा मुक्त वावर आणि कर्नाळा किल्ला या साऱ्या निसर्गसंपदेमुळे हे पक्षी अभयारण्य सुट्यांच्या दिवसात गिर्यारोहक, पक्षीप्रेमी, निसर्गमित्र आणि प्राणी मित्रांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. कायम स्वरूपी वास्तव्यासोबत या अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांची मोठी संख्या आहे. अनोख्या पक्ष्यांमुळे ज्येेष्ठांसोबत बालकांना येथे वेळ घालवायला आवडतो. मात्र यंदाचा उन्हाळा न सोसावणारा असल्याने पर्यावरणप्रेमींनी कर्नाळाकडे पाठ फिरवल्याचे दिसते.
अभयारण्यातील प्राणीपक्ष्यांना उन्हाळ्याच्या झळांमध्ये पिण्याचे पाणी सुरळीत मिळावे यासाठी वन विभागाने 30 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पाण्याने भरलेले सिमेंटचे लहान पातेले प्राण्यांसाठी बनवून या पाणवठ्यांना पाण्याने भरत असल्याची माहिती वन विभागाचे अधिकारी एन. डी. राठोड यांनी दिली.
2857 पक्षीप्रेमींची भेट मागील वर्षी कर्नाळा पक्षी अभयारण्याला 78 हजार 746 पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये एप्रिल महिन्यात 7,348 पक्षी प्रेमी आले होते. मात्र यंदाच्या एप्रिल महिन्यात अवघे 2,857 पक्षी प्रेमींची नोंद प्रवेशव्दाराच्या नोंदवहीत झाली. एप्रिल महिन्यात अभयारण्यात 2,418 प्रौढ व्यक्ती, 278 मुले, 153 विद्यार्थी आणि 8 विदेशी नागरिक आल्याची नोंद झाली आहे. मात्र मागील अनेक वर्षात (करोनाकाळ वगळता) एप्रिल महिन्यात इतर वर्षांच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी असल्याचे वन विभागाचे कर्मचारी सांगतात.