नारळाच्या वृक्षांची सुरक्षा ऐरणीवर

पाण्याअभावी सागरी मार्गावरील झाडे करपली

| उरण | वार्ताहर |

सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून 4 हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र पावसाळ्यानंतर सिडकोच्या दुर्लक्षपणामुळे ही नारळाची वृक्ष पाण्याविना करपू लागली आहेत. त्यामुळे सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या वृक्षांचे हाल होऊ लागले आहे.

उरण तालुक्यातील सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा (झाडे लावा झाडे जगवा) या माध्यमातून हाती घेतला आहे. त्या धर्तीवर सिडकोने पागोटे भेंडखळ करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यांवर जवळपास एक कोटी रुपये खर्च करून नारळाची झाडे लावली आहेत.

पावसामुळे या झाडांना पाण्याची आवश्यकता नव्हती, मात्र सध्या प्रचंड ऊन पडू लागल आहे. या उन्हाच्या तडाख्यात ही झाडे पाण्याविना करपू लागली आहेत. तर दुसरीकडे रस्त्याच्या कडेला उगवलेल्या गवताला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. याच ठिकाणावरून गॅस वाहिन्या जात असल्याने आग लागणे धोकादायक बनणार आहे. सिडकोने कोस्टल मार्गावर नारळाची झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी उरण मधील निसर्गमित्र महेश घरत यांनी केली आहे.

Exit mobile version