| पेण | प्रतिनिधी |
जेव्हापासून शैक्षणिक क्षेत्राला खासगीकरणाची कीड लागली आहे, तेव्हापासून शासकीय शाळा जणू काही ओस पडू लागल्या आहेत. ज्या शासकीय शाळांमध्येच शिकून अनेक विद्वान झाले, त्याच शाळांची आज दयनीय अवस्था आहे. गुरूजींना विद्यार्थी शोधण्याला प्राधान्य द्यावे लागत आहे. कारण, सर्रास पालक आपल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये घालत आहेत. आज पेणसह रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी नसल्याने जणू काही शेवटची घरघर या शाळांना लागली आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण 3600 शाळा आहेत. यामध्ये 2600 शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. इतर उरलेल्या 1000 शाळांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित व नगरपालिकेच्या शाळा आहेत. तर पेण तालुक्याचा विचार करता तालुक्यात 218 शाळा जिल्हा परिषदेच्या, 9 शाळा नगरपालिकेच्या, पाच आश्रमशाळा आहेत. खासगी शाळा 63 असून, यामध्ये अनुदानित 31, आणि विनाअनुदानित 32 शाळा आहे. आजघडीला खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा जणू काही पूर आलेला आहे. शासन नियमानुसार एका वर्गात 40 विद्यार्थी बसविणे बंधनकारक आहे. परंतु, खासगी शाळा 60 ते 70 विद्यार्थी एका वर्गात कोंबतात. तर, सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वानवा आहे. ही वानवा एवढी भीषण आहे की, आज सर्व कामधंदे सोडून गुरूजींना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. यादरम्यान असे ही घडून आले आहे की, खासगी शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची नावे सरकारी शाळांमध्येदेखील आढळत आहेत. तसे पाहता, खासगी शाळांमध्ये अक्षरशः विद्यार्थी कोंबून-कोंबून भरले जातात. तरीदेखील पालकांची ओढ खासगी शाळांकडे आहे. मात्र, सरकारी शाळांमध्ये 5 ते 10 पोरांमागे एक गुरूजी असतात. नक्कीच विद्यार्थीकडे लक्ष देण्याचा वेळ गुरूजींकडे जास्त असतो, तरीदेखील आज विद्यार्थी संख्या घसरत चालली आहे. याचे दुसरे कारण, म्हणजे झपाट्याने सुरू असलेले शहरीकरण. आजघडीला शासकीय शाळांना विद्यार्थ्यांना येण्याचे आवाहन करावे लागत आहेत, तर खासगी शाळांना पुरे झाले आता आमच्याकडे जागा नाही. अशी स्थिती पेणसह रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राची झाली आहे.