बदलत्या हवामानाने पोपटीचा खमंग उशीराने दरवळणार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात वालाची पोपटी हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पोपटीचा हंगाम सुरू झाल्यानंतर सगळीकडे रात्रीच्या सुमारास पोपटीचा सुवास दरवळला जातो. मात्र यावर्षी बदलत्या हवामानामुळे खवय्यांना पोपटीची चव चाखण्यास विलंब लागणार आहे. बदलत्या हवामानामुळे आणि अवेळी पावसाने जमीन ओली असल्याने शेतकर्‍यांनी अद्याप वालाची शेती केलेली नाही. तर काही भागात वालाची लागवड झाली असली तरी अवेळी पावसाने ही लागवड पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. त्यामुळे पोपटीसाठी लागणारा वाल हा उशिरा पिकणार असल्याने पोपटीची चव ही थंडी ऐवजी उन्हाळ्यात चाखावी लागणार आहे. हवामान विभागाने पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली असल्याने वाल लागवड करणारा शेतकरी चिंतेत पडला आहे.

सहा हजार हेक्टरावर लागवड
रायगड जिल्ह्यात भात कापणी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात वालाची शेती शेतकरी लावत असतात. जिल्ह्यात साधारण सहा हजार हेक्टरवर वालाची लागवड घेतली जाते. सध्या पाचशे हेक्टरवर वालाची लागवड झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील वाल हा प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वालाचे उत्पादन घेतात.वाल सुकवून तो पायलीच्या माध्यमातून विकला जातो. त्यामुळे रायगडच्या वालाला मागणीही भरपूर आहे.

वालाची पोपटी ही जिल्ह्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. हिवाळ्यातील गारव्यात वाल तयार झाल्यानंतर पोपटीच्या पार्ट्यांना जिल्ह्यात उत येतो. जिल्ह्यात येणारा पर्यटकही पोपटीचा आस्वाद घेण्यास उत्सुक असतो. शाकाहारी, मांसाहारी पद्धतीची पोपटी मडक्यात आगीच्या ज्वालात तयार केली जाते. त्यामुळे त्याची न्याहारी चव चाखण्याची खवय्यांना वेध लागले असतात. सध्या वातावरणात बदल झाला असून जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस ही पडून गेला आहे. तर अद्यापही पावसाचे सावट हे शेतकर्‍यांच्या डोक्यावर टांगून आहे. अवेळी पावसाने शेतजमीन ओली असल्याने वालाची लागवड करणे शक्य नाही. जिल्ह्यात काही भागात शेतकर्‍यांनी भात कापणीनंतर वालाची लागवड केली होती. मात्र अवेळी पावसाने घेतलेले पीक वाया गेले आहे. जमीन सुकत नाही तोपर्यत वालाची लागवड करणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी वालाची लागवड उशिरा केली जाणार असल्याने पीक येण्यासही उशीर होणार आहे. त्यामुळे पोपटीचा हंगाम यावेळी लांबणीवर जाणार आहे.

Exit mobile version