| आगरदांडा | प्रतिनिधी |
वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, हा लोकशाहीचा आधारस्तंभ टिकवून ठेवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता करीत असतो. वृत्तपत्रांच्या जगात वृत्तपत्र विक्रेता हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, गेले अडीच वर्षे कोरोनामुळे वृत्तपत्र विक्रेते देशोधडीला लागला आहे.
दररोज विक्रेत्यांची आतुरतेने वाट पाहणारा वाचक कोरोनाच्या काळात पेपर घेणे टाळत होते आणि त्यात घराबाहेर पडत नसल्याने वृत्तपत्राचा खप अर्ध्यापेक्षा कमी होत गेला. त्यात प्रत्येक वृत्तपत्र मालकांनी आपल्या पेपर प्रसिद्धीसाठी वाचकांना ऑनलाईन पेपर दाखविल्याने पेपर खपावर खूपच परिणाम होऊ लागला आहे. मुरुडचे 85 टक्के वाचक ऑनलाईनला पेपर बघणं पसंत करत असल्याने त्याचा परिणाम पेपर विक्रीवर होत आहे.
ऑनलाईन पेपर बंद करण्याची आमची मागणी वृत्तपत्र मालकांनी मान्य केली, तर नक्कीच पेपरचा खप पूर्वीसारखा होईल आणि त्यात ही वाढ दुप्पट होईल, अशी आशा पेपर विक्रेते दिलीप गुंजाळ यांनी व्यक्त केली. मुरुडच्या वाचकांसाठी दररोज वृत्तपत्र घरपोच देण्याचे काम ते अखंडितपणे करता येईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
रोजच्या रोज पेपर घेणारे वाचक ऑनलाईन पेपर वाचत आहेत. त्याचा परिणाम या वृत्तपत्र विक्रीवर होत आहे. तरी सर्व पेपरच्या मालकांनी आमचा (वृत्तपत्र विक्रेते) विचार करून ऑनलाईन पेपर दाखविणे बंद करावे.
दिलीप गुंजाळ, वृत्तपत्र विक्रेते