रेवदंडा पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी
| रेवदंडा | वार्ताहर |
हरिहरेश्वर किनार्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळाव चेकपोस्टवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याठिकाणी चोख नाकाबंदी करण्यात आली असून, पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. प्रत्येक वाहनाचीही कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
याठिकाणहून मुरूड व श्रीवर्धनकडून वाहने ये-जा करीत असतात, त्यामुळे हे ठिकाण संवेदनशील आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नंदगावे हे स्वतः वाहनांची तपासणी करीत आहेत. त्यांच्यासमवेत सात ते आठ पोलीस तैनात आहेत. प्रत्येक गाडी तपासणी करण्यावर पोलिसांचा भर असून, साळाव चेकपोस्टवर पूर्णतः सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातूनही नजर ठेवली जात आहे. काही वर्षांपूर्वी श्रीवर्धनमधील शेखाडी गावात उतरलेल्या स्फोटकाने संपूर्ण मुंबई हादरवून टाकली होती, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी केले आहे.
अलिबाग, रोहा, मुरूड या तीन तालुक्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणून साळाव चेकपोस्टची ओळख आहे. येथे नित्याने वाहनांची जा-ये सुरू असते. रेवदंडा पोलिसांच्या अखत्यारीत येत असलेल्या या चेकपोस्टला नित्याने पोलीस बंदोबस्त असतो; परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.