| माणगाव | वार्ताहर |
रानमेव्यासाठी जिल्ह्यातील माणगाव, तळा, म्हसळा, मुरुड हे दक्षिण रायगडातील तालुके प्रसिद्ध आहेत. उन्हाळी दिवसात या तालुक्यात तयार होणाऱ्या रानमेव्याला खवय्यांची खास पसंती असते. मात्र, गेल्या दिवसांपासून या रानमेव्याची चव दूर होत असल्यााने खवय्ये नाराज आहेत.
दरवर्षी बदलणारे हवामान, उन्हाळी दिवसात जंगलांना लागणारे वणवे या पार्श्वभूमीवर रानमेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. दक्षिण रायगडमधील जंगलात उन्हाळी दिवसात करवंदे, जांभळे, रांजण, कोकम अशा अनेक फळांना बहर येतो. या फळांची चव अगदी न्यारी असून आरोग्याच्या दृष्टीने ही फळे लाभदायी असतात. त्यामुळे ग्रामीण तसेच, शहरी भागात या रानमेव्याला चांगली मागणी असते. यातून अनेक आदिवासी महिलांना, बांधवांना या रानमेव्याच्या विक्रीतून चांगला रोजगार व आर्थिक लाभ मिळतो. वणव्यांमुळे हा रोजगार व रानमेव्याची चव दूर राहिली आहे. या रानमेव्याच्या विक्रीतून मिळणारा रोजगारही हरवत चालला असून आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून जंगलात अचानक वणवे लागत आहेत. यामुळे फळझाडांचा मोहोर करपून जात आहे. फेब्रुवारी महिना हा जंगलात मोहोर लागण्याचा व फळ प्रक्रिया सुरू होण्याचा असतो. मात्र, वणव्यांच्या धगीमुळे तो बाधित होत असून रानमेव्याचे नुकसान होत आहे. अनेक झाडे, झुडपे यांना वणव्याची धग लागली असल्याने त्यांचा मोहोर करपून गेला आहे. त्यामूळे रानमेवा संकटात सापडला असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी तसेच, रानमेवाप्रेमी नाराज झाले आहेत.
बाळाजी कालप,
कोकणातील रानमेवा हा उन्हाळी दिवसातील खास आकर्षण आहे. याची लज्जत न्यारी असते. गेल्या वर्षापासून हा रानमेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. जंगलात लागणारे वणवे यामुळे रानमेव्याचे प्रमाण कमी झाले आहे.
रानमेवाप्रेमी, माणगाव.