। पाली | प्रतिनिधी ।
ताडगाव येथील जांभा दगडाच्या खाणीतून जांभा दगड भरून निघालेल्या डंपरला शुक्रवारी (दि.27) कवेळे गावाच्या हद्दीत घाट उतरत असताना वळणावर अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही असे वृत्त आहे.
घाटातील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डंपर उतारावरून खड्ड्यात पलटी होऊन अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातानंतर नागरिकांकडून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जांभा दगड भरला होता का? ओव्हरलोडमुळे घाटात ब्रेक लागत नाहीत, याकडे दुर्लक्ष का केले जाते? ड्रायव्हर शिक्षित आहे का? घाट रस्त्यावर गाडी चालवण्याचे प्रशिक्षण चालकाला आहे का? संबंधित चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना आहे का? इन्शुरन्स कागदपत्रे अद्ययावत आहेत का? ताडगाव ते कवेळे हा घाट रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा आहे. शालेय मुले, महिला आणि प्रवासी तसेच खाजगी वाहने मोठ्या प्रमाणावर याच रस्त्याने ये-जा करतात. मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल देखील नागरिकांमधून विचारला जात आहे. या प्रकरणी खाण मालक, वाहतूकदार आणि संबंधित वाहतूक यंत्रणेने खुलासा करावा आणि ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी, अशी देखील मागणी करण्यात येत आहे.






