| श्रीवर्धन | प्रतिनधी |
भरावासाठी माती वाहून नेणाऱ्या दोन डंपर चालकांचा शनिवारी (दि.25) सकाळी श्रीवर्धन समुद्रकिनारी उद्दामपणा पाहायला मिळाला. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याजवळील मठाच्या स्मशानभूमी जवळ दोन डंपर रस्त्याच्या मधोमध उभे करून डंपर चालक समुद्रकिनाऱ्यावरती निघून गेले होते. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या पर्यटकांना व नागरिकांना आपली वाहने डंपरच्या मागे उभी करून डंपरच्या चालकांचा शोध घेण्याची वेळ आली.
शनिवार असल्यामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारी नेहमीच गर्दी असते. अनेक वॉटर स्पोर्ट्सवाले आपली विविध वॉटर स्पोर्ट्सची साधने घेऊन समुद्रकिनाऱ्यावरती असतात. अशातच समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला एका विकासकाचे काम सुरू असून त्या ठिकाणी मातीचा भराव करणारे डंपर समुद्रकिनाऱ्यावरील मार्गावरून उभे करण्यात येतात. या डंपर चालकांना समुद्रकिनाऱ्यावरून वाहतूक करण्याची परवानगी दिली कुणी? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी ओरडाआरड केल्यानंतर डंपर चालक आले व आपल्या गाड्या घेऊन समुद्रकिनाऱ्याने खाली करण्यासाठी निघून गेले. हे दोन्ही डंपर उभे केले होते ती स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराची जागा आहे. तरी, पोलिसांनी श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरून वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई करावी व समुद्रकिनाऱ्यावरून वाहने नेऊ नयेत अशी डंपर चालकांना समज द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.







