| पनवेल | प्रतिनिधी |
मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असलेले डेब्रिज, माती, कचरा, रॅबीट अनधिकृतपणे नवी मुंबईत टाकणाऱ्यांविरोधात सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या दक्षता पथकांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सिडको दक्षता पथकांच्या या कारवाईनंतरही नवी मुंबईत डेब्रीज टाकण्याचे प्रकार सुरुच असल्याचे दिसून येत असून, खारघर से 22 सेंट्रल पार्क जवळ गोल्फ कोर्ससमोर सिडकोच्या मोकळ्या जागेत डेब्रीज टाकत असलेला एक डंपर सिडकोच्या पथकांनी नुकताच पकडला. याप्रकरणी डेबीज टाकतांना मिळून आलेल्या डंपरचालकाविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत विविध ठिकाणच्या परिसरात मोकळ्या जागेमध्ये डेब्रीज माफियांकडून मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रिज अनधिकृतपणे टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यानुसार दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, आभियांत्रिकी विभाग व पोलिस विभाग यांच्यासह दि.8 ऑगस्ट रोजी सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असतांना सकाळी अकराच्या सुमारास एमएच-43-वाय-7867 या डंपरवरील चालक विलास गंगाधर रणशुर (41) रा. उलवे से-23 हा त्याच्या ताब्यातील डंपर मधून मानवी जिवितास व लोकांच्या आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रीज हे अनधिकृतपणे आणून खारघर से-22 येथील गोल्फ कोर्ससमोर सेंट्रल पार्कजवळ सिडको कार्यक्षेत्रात डेब्रीजचा डंपर खाली करत असतांना पथकाच्या हाती लागला. यावेळी भरारी पथकाने सदरचा डंपर जप्त केला असून याबाबत चालक विलास रणशुर याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







