बोरगावातील जि.प.ची उपक्रमशील शाळा; उपक्रमांतर्गत शाळेच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष
| खरोशी | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील बोरगाव येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा पर्यावरण स्नेही, बोलकी व उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यासह जिल्हास्तरावर नावलौकिक मिळवलेली शाळा आहे. या शाळेने अनेक उपक्रम सादर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाची शिदोरी दिली जाते. या दरम्यान, बोरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगड जिल्ह्यामध्ये परसबाग तयार करण्यामध्ये सरस असल्याचे दिसून येत आहे.
पेण तालुक्यातील बोरगाव येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा ही उपक्रमशील शाळा आहे. पर्यावरण स्नेही व बोलकी उपक्रमशील शाळा उपक्रमांतर्गत शाळेच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष देते. शाळेच्या परिसरातील भिंती आणि झाडांच्या आजूबाजूच्या प्रत्येक जागेचा वापर विविध शैक्षणिक संकल्पना मांडण्यासाठी करण्यात आला आहे. बोरगाव शाळा आणि शालेय परिसर हे केवळ भौतिक घटक नसून ते शिक्षणाचे प्रभावी माध्यम बनू शकते, या विचारातून शाळेने “बोलकी शाळा” व “शालेय परसबाग” हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करणे, त्यांना कृतीतून शिकण्याची संधी देणे, शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे, याबरोबरच विद्यार्थ्यांना परिसरातील विविध प्रकारच्या वनस्पती व त्यांचा उपयोग प्रत्यक्ष अनुभवातून समजावून देणे हा आहे. या शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, शोभेची झाडे असून काही झाडांना क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. स्कॅन करून त्या झाडांची प्रत्यक्ष माहिती मिळते. शाळा परिसरात आंबा, फणस, नारळ, केळी, पेरू, काजू, पपई, शेवगा, बदाम, सुपारी, अननस, आवळा, मलबेरी, कडुलिंब यासह वांगी, मिरची, भेंडी, कारले, मुळा, शिराळा, दुधी भोपळा, चवळी, घेवडा इत्यादी भाज्यांची लागवड शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केली आहे. त्या भाज्यांचा वापर मध्यान्ह भोजनात केला जातो. तसेच, शालेय परिसरात सेंद्रिय खत निर्मिती केली जाते व त्याचा वापर शालेय परिसरातील झाडांसाठी केला जातो.
त्याचबरोबर शालेय परिसरात अमृतवाटीका, वाचन कट्टा, सागरमित्र, प्लास्टिक पिंजरा, रेन हार्वेस्टिंग वॉटर यांसारखे उपक्रम तसेच भारताच्या नकाशात राज्ये व त्यांच्या राजधान्या दाखवण्यात आलेल्या आहेत. अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव दिले जातात. यासाठी पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे, केंद्रप्रमुख, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य मिळत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य वर्षभर लाभत असून सहकार्य ही तेवढेच केले जाते. एकंदरीत जिल्हा परिषद बोरगावची प्राथमिक शाळा रायगड जिल्ह्यामध्ये परसबाग तयार करण्यामध्ये सरस असल्याचे दिसून येत आहे.






