डंपरची वाहतूक ग्रामस्थांच्या जीवावर

बायपासने वाहतूक वळविण्याची मागणी

। कोर्लई । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत हद्दीतील समुद्र किनारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून ठेकेदार डी.व्ही पवार इन्फ्रास्ट्रक्चर यांनी घेतलेल्या सुमारे 120 कोटींच्या जेट्टिचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱे दगड नजिकच्याच खारमजगाव येथील खाणीवरुन डंपरव्दारे आणले जात आहे. या डंपरची नांदगावच्या भर बाजारपेठेतून होत असलेली वाहतूक येथील ग्रामस्थांच्या जीवावर बेतत असल्याने ती नजिकच्याच भातशेतीतून काढण्यात आलेल्या बायपास रस्त्याने करण्यात यावी, अशी मागणी नांदगावच्या ग्रामस्थांनी मुरुडच्या तहसीलदारांना केली आहे.

मजगाव ग्रामपंचायत हद्दीतील खारमजगाव परिसरातील एका दगड खाणीतून बी ग्रुप, आकाश ट्रान्सपोर्ट आदी वाहतूक ठेकेदारांचे शेकडो डंपर दररोज नांदगावच्या भर बाजारपेठेतून दिवसभर सातत्याने बिनदिक्कतपणे वाहतूक करीत आहेत. जवळपास पंधरा ते वीस टन वजनाचे हे डंपर बाजारपेठेतील वळणावर वाहतूक कोंडी करीत आहेत. शिवाय त्यांचे चालक जास्त खेपा पडाव्यात म्हणून बेदरकारपणे भरधाव वेगात डंपर चालवत आहेत.

विशेष म्हणजे या डंपरच्यामागील बाजूस असलेला वाहन क्रमांक नाही, तसेच त्यांना पाठीमागे असलेली लाल लाईट नाही. मंगळवारी यातील एका डंपरचा फाळका भर नाक्यावर तुटून लोंबकळत असतांना एक रिक्षा चालक व एक ग्रामस्थ अक्षरशः जीवघेण्या अपघातातून वाचले आहेत. तसेच, अनेक वाहन चालक व येथील पादचार्‍यांना त्यांचा नाहक त्रास होत असून ही वाहतूक त्यांच्या जीवावर बेतत आहे.

हे डंपर यापूर्वी येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे बांधकाम सुरू असताना नजिकच्याच शेतीतून काढण्यात आलेल्या बायपास रस्त्याने ये-जा करीत होते. रस्त्याचे काम पूर्ण होऊन पंधरा दिवस झाले असताना मोठ्या वजनाच्या या डंपरची वाहतूक या रस्त्यावरुन करण्यास कशी परवानगी सा.बां. विभागाने दिली, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. अन्यथा पावसाळी हंगामापूर्वीच हा रस्ता फुटण्यास वेळ लागणार नाही. तरी, मुरुड तहसीलदारांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी नांदगावच्या सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version