। खेड । प्रतिनिधी ।
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी प्रसिद्ध आहेत. खेड येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमातच मुख्य सचिवांची फोनवरुन झाडाझडती केल्याचे दिसून आले.
पवार कोकणात आहेत. त्यांनी खेडमध्ये कामांचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक अधिकार्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी थेट आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांना फोन लावला.
मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील काही विषय पालकमंत्री आणि स्थानिक अधिकार्यांच्या निर्णयाने घ्यायचे आहे, असं सांगितलंय. कॅबिनेटचे निर्णय अंतिम असतात. मुख्यमंत्री आणि कॅबिनेट सर्वोच्च असतात. मी सांगतो तसं करा, असं अजित पवारांनी भर मीटिंगमध्ये फोन लावून खडसावलं. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, राजकीय आरोप प्रत्यारोपांवर बोलणं टाळलं. मी फटाफट येऊन निर्णय घेतले, यातून लोकांना फायदाच होणार आहे, असं ते म्हणाले.
खेडमध्ये पूर परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध कामांवर अजित पवारांनी चर्चा केली. पूर परिस्थितीत किती पैसे मिळाले, तसेच कोणाला किती मदत पोहोचली, असं पवारांनी विचारलं. यानंतर त्यांनी चार खात्याच्या सचिवांना फोन लावून विविध सूचना केल्या. यानंतर अजित पवार माध्यमांशी बोलून कार्यकर्ता मेळाव्याला रवाना झाले.