शाळेतील आठवडा बाजारात खरेदीसाठी झुंबड

। खरोशी । वार्ताहर ।

पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.5) आठवडे बाजार भरवण्यात आला. यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजी घ्या भाजी, काकडी, गाजर, कांदे, बटाटी, ज्वेलरी, खाद्य पदार्थ, फळभाज्या, पालेभाज्या, विविध रंगाची फुले घ्या, पाणीपुरी, चटकदार भेळ, गरम बटाटेवडा, असा काढलेला पहाडी आवाज, शेतमाल विक्रीसाठी प्रत्येकाची जागा पकडण्याची घाई हे सर्व चित्र दिसून आले.

शालेय मुलांना व्यवाहार ज्ञान येणे, हिशोब करता येणे, वजन मापांची ओळख होणे, पैशाचे सर्व व्यवाहार अचूकपणे करता येणे, वस्तूंची खरेदी व विक्री करता येणे, ग्राहक व विक्रेता यांच्यातील संभाषण कौशल्य आत्मसात करता येणे, मुलांची आकलन शक्ती वाढणे याच उद्देशाने आठवडा बाजाराचे योग्य नियोजन शिक्षकांनी केले होते. पालक व शालेय मुलांचा ग्रामस्थांचा खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते.

यावेळी विविध प्रकारचे 51 स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते. पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अँड. बापूसाहेब नेने, वसंत आठवले, संजय कडू, सुधीर जोशी, लेखा ठाकूर, आरती गावंड, रोहिणी म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समिती व पालक आदी मान्यवरांच्या शुभहस्ते आठवडे बाजाराचा शुभारंभ झाला. यावेळी पहिली ते चौथीचे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version