खोदाईमुळे श्रीवर्धनमध्ये धुळीचे साम्राज्य

| श्रीवर्धन | वार्ताहर |

जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे श्रीवर्धन शहरातील टिळक मार्ग व बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. याचा त्रास शहरवासियांना मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

शहराला रानवली येथील पाझर तलावामधून पाणीपुरवठा करण्यात येतो. अंदाजे पन्नास वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कास्टिंग मेटलच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. परंतु अनेक वर्षे होऊन गेल्यानंतर या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच रानवली पाझर तलावाजवळ जलशुद्धीकरण प्रकल्पाचे देखील काम हाती घेण्यात आल्याने नवीन होणार्‍या जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी शहरामध्ये आणण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

गेल्या वर्षी पावसाळ्या अगोदर हे काम पूर्ण झाले होते. परंतु आता यावर्षी पावसाळा संपल्यानंतर श्रीवर्धन शहरातील सर्व भागांमधील जलवाहिन्या बदलण्याचे काम नगर परिषदेने हाती घेतले आहे. शहरातील समुद्र किनार्‍याकडे जाणारा मार्ग, भैरवनाथ पाखाडी, दाबक पाखाडी या परिसरात जलवाहिन्या टाकून झाल्यानंतर त्यावरती खडी व डांबर टाकून रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. परंतु शहरातील मुख्य रस्ता असलेल्या टिळक मार्ग व बाजारपेठ या परिसरातील जलवाहिन्या टाकून झालेल्या असल्या तरीही अद्याप संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी डांबरीकरणाचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती धूळ उडत असते. कोणतेही वाहन गेले किंवा चार चाकी वाहन गेले की धूळ जास्त प्रमाणात उडते. संबंधित ठेकेदार धुळ उडू नये म्हणून केवळ दिवसातून एक वेळाच या ठिकाणी पाणी मारतो. परंतु एक वेळ मारलेले पाणी सुकून गेल्यानंतर पुन्हा धुळीचा त्रास सुरू होतो. तरी श्रीवर्धन नगर परिषदेने संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याबाबत सूचना द्याव्यात.

तसेच रस्त्याच्या मधून जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरामध्ये देखील डांबर व खडी टाकण्यात यावी. श्रीवर्धन शहरात शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांची सतत ये-जा सुरू असते. खणलेला रस्ता ओबडधोबड झालेला असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होते व धुळीचा त्रास देखील होतो. तरी या गोष्टीकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Exit mobile version