रखडलेले कामाचा प्रवाशांना फटका
| पनवेल | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचा प्रवास अतिशय खडतर झाला आहे. अशातच रस्त्यावरील ड्रेनेजसाठी केलेले खोदकाम पावसाच्या पाण्याबरोबर रस्त्यावर वाहून आलेली मातीमुळे सध्या पळस्पाफाटा परिसरात धुळीतून प्रवास करण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पा फाटा या ठिकाणाहून पुणे, मुंबई, गोवा व जेएनपीटी पोर्टला जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे याठिकाणी वाहनांची नेहमी वर्दळ असते. जेएनपीटी पोर्टला जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणांहून मोठ्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असते. अशात महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रित खडी टाकण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर आता पाऊस थांबल्यामुळे सर्वत्र धूळ पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणांहून अवजड वाहने गेल्यानंतर पाठीमागे धुळीचे लोट उडत असल्याने प्रवास करणे जिकरीचे झाला असून महामार्गालगत असणाऱ्या गावांमध्ये श्वसनाचे विकार वाढले आहेत. त्यामुळे एकीकडे महामार्गावरील खड्डे तर दुसरीकडे उडणाऱ्या धुळीचा सामना करत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
श्वसनाचे रोग होण्याची शक्यता मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम अतिशय मंदगतीने सुरू होते. सध्या कामाला गती आल्याने कामाचीही धूळ या ठिकाणी उडत आहे. सध्या रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे पाऊस पडला तर या मार्गावर चिखल होत असल्यामुळे अपघाताची भीती असते. तर पाऊस थांबल्यावर धुळीमुळे खोकला, सर्दी यासारखे आजार होताना दिसत आहेत. या मार्गावर काही ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या खडीमुळे तर काही ठिकाणी पाणी व गटर बनवण्यासाठी टाकण्यात - येणाऱ्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. या ठिकाणी काही कामानिमित्त काही वेळ जरी वाहन रस्त्यावर थांबवले तर वाहनासह माणसावरही धुळीचा थर साचत आहे. त्यामुळे श्वसनाचे रोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
