दिवाळीच्या आगमनावर धुरळ्यांची आतिषबाजी

पालीत अद्यापही खड्ड्यांचेच साम्राज्य
नागरिकांनामध्ये असंतोष

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

जिल्ह्यातील मोरया भाविकांसाठी श्रद्धेचे तथा सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेले पाली समस्यांचे माहेरघर बनले आहे. दिवाळीच्या आगमनावरही खड्ड्यांच्या अंधारमयी साम्राज्यापासून पालीची सुटका होत नसून सद्यःस्थितीत नागरिक या समस्येसह धुरळ्यांच्या त्रासानेही बेजार होत आहेत.
खराब रस्त्यामुळे ऐन सणासुदीला बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची व खरेदीसाठी पालीत येणार्‍या नागरिकांची खूप गैरसोय होत आहे. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. तब्बल 3 ते 4 वेळा खडी व ग्रीट टाकून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले आहेत. मात्र अवजड वाहतुकीमुळे पुन्हा खड्ड्यांनी डोकं वर काढले आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली खडी व ग्रीट बाहेर येऊन खूप मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. मोटारसायकल घसरून अपघात देखील होत आहेत.
पाली स्टेट बँक पासून गांधी चौक, महावीर मार्ग ते थेट गणेश मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आगरआळी, सावंतआळी, रामआळी ते मधल्या आळी पर्यंतचा रस्ता, भोई आळी, मिनिडोअर स्टँड ते बसस्थानक पर्यंतच्या रस्त्याची भल्या मोठ्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. त्याचबरोबर बल्लाळेश्‍वर नगर, धुंडीविनायक नगर व शिळोशी आणि मढाळी गावाकडे जाणारा रस्ता प्रचंड फुटला आहे. खड्डे व खडीमुळे पादचार्‍यांना चालतांना कसरत करावी लागते. विद्यार्थी, महिला व वृद्धांची तर खूपच गैरसोय होते. खड्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी देखील होत आहे. प्रत्येकजण या खराब रस्त्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

Exit mobile version