भर पावसात महिला पोलिसांची कर्तव्यदक्षता

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

। पनवेल । वार्ताहर ।

गेल्या काही दिवसांपासुन पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. अशातच उरण नाका याठिकाणी प्रवास करणार्‍या वाहनांची सख्या जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी या ठिकाणी कर्तव्यावर असणार्‍या वाहतूक महिला पोलीस वैशाली कोकाटे व साधना पवार यांनी भर पावसात नागरिकांसाठी मार्ग मोकळा केला. त्यामुळे अनेकांनी त्या कर्तव्यदक्ष महिला अधिकार्‍यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करीत त्यांच्या कार्याला सलाम केला.

पनवेल परिसरातील उरण नाक्यावर वाहतूक कोंडी हि नित्याचीच आहे. रस्त्यावरील बाजारपेठ आणि पार्किंग येथील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत.

पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी पोलीस तैनात राहून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असतात.

अलिकडेच पावसामुळे या भागात वाहतूक कोंडी वाढू लागल्याचे पाहून कर्तव्यावर असलेल्या दोन महिला पोलिसांनी पावसाची पर्वा न करता उरण नाका पाईंटवर उभं राहून भिजतच वाहतुकीचे नियोजन केलं. या महिला जवानांची कर्तव्य निष्ठा पाहून ये-जा करणार्‍या अनेकांना तो क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह आवरला नाही. अनेकांनी तो फोटो तसेच व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला. त्यामुळे त्या दोन महिला पोलिसांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उरण नाक्यावर वाहतूक कोंडी

उरण नाक्यावर पावसाळा आणि रस्त्यावर खड्डे ही दरवर्षी ओढावणारी समस्या आहे. पनवेलपासून वडघरकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र या खड्ड्यांमुळे पनवेलबाजूकडून वडघर आणि उरण बाजूकडून पनवेलकडे जाणार्‍या वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडे वाहतूक कोंडी होते. याबाबत करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्‍वर आंग्रे तसेच पोलीस पाटील कुणाल लोंढे यांनी सिडकोकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र सिडको या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

Exit mobile version