| पनवेल | प्रतिनिधी |
सायन-पनवेल महामार्गावरील खारघर कोपरा जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी यु टर्न बांधकाम करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल महानगरपालिका महिला जिल्हाध्यक्ष हर्षला तांबोळी यांनी पत्राद्वारे पालिकेकडेकेली आहे. तसेच, दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे मुंबईवरून येणारी वाहतूक नवीन उड्डाण पुलाद्वारे खारघरमधील कोपरा पुलाच्या आधी पर्यायी रस्त्याने फिरवली जावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
कोपरा गावातून आणि खारघरमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या वाहनांना या ठिकाणी थेट वळण्याची सुविधा नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुख्य सायन-पनवेल महामार्गापासून खारघरच्या आत थेट कोपरा रस्त्यावर जाणाऱ्या यु टर्न रॅम्पचे बांधकाम केल्यास येथे रोज होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. त्यामुळे महामार्गावर अडथळे निर्माण न करता वाहने थेट खारघरमध्ये सुरळीत वळवता येतील. तसेच, कोपरा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. स्थानिक रहिवाशांसाठी वाहतूक व्यवस्थापन सुरक्षित होईल. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होणार असल्याचे हर्षला तांबोळी यांनी म्हटले आहे.







