आदित्य जानोरकर यांचा आयुक्तांना सवाल
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेने चारही प्रभागांमध्ये दैनिक बाजार बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. नागरिकांच्या सेवेत सर्व सोयी सुविधानियुक्त असे प्रशस्त दैनिक बाजार उपलब्ध होणार असल्याचे पनवेल महानगरपालिकेने सांगितले आहे. मात्र, कोणत्या निकषावर बाजारातील दुकाने वितरण करणार आहात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव आदित्य जानोरकर यांनी पालिकेला विचारला आहे.
दैनिक बाजारातील दुकानांमध्ये पनवेल परिसरातील स्थानिक बेरोजगार तरुण आणि स्थानिक महाराष्ट्र राज्याचे डोमासाईल प्रमाणपत्र असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच, ही दुकाने वितरित करताना 30 ते 60 वर्षांच्या करारावर देण्यात यावे. तसेच, जी व्यक्ती स्वतः या दुकानात व्यवसाय करेल त्यांना ही दुकाने वितरित करण्यात यावी, अशी नियमावली बनवण्यात यावी. दुकानांचे होणारे वितरण कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून न काढता स्वतः महापालिकेकडून काढण्यात यावे, अशी मागणी आदित्य जानोरकर यांनी पालिका उपायुक्त वैभव विधाते यांच्याकडे केली आहे. अशा प्रकारे वितरण झाले नाही तर आंदोलनाचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे.






