रेशन दुकानात फोरजी ई-पॉस मशीन
| अलिबाग | प्रमोद जाधव |
तांत्रिक समस्यांमुळे टूजी ई पॉस मशीन डोकेदुखी ठरत होती. शिधापत्रिकाधारकांची नोंद होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आता रेशन दुकानांमध्ये फोरजी ई-पॉस मशीन दाखल झाली आहे. त्यामुळे धान्य वितरण व्यवस्थेत गतिमानता येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्श्याचे रेशन तात्काळ मिळण्यास मदत होणार आहे.
रेशन दुकानांतील धान्य वितरणाचे कामकाज गतिमान व्हावे यासाठी सरकारने 2018 पासून ई-पॉस मशीन मशीनद्वारे धान्य वितरण करण्याची व्यवस्था केली. मात्र, ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे कामकाज झाल्याचे दिसून आले. इंटरनेट सुविधांचा अभाव, टूजी ई-पॉस मशीनच्या बटणांमध्ये बिघाड, मध्येच मशीन हँग होणे, तांत्रिक अडचणींमुळे त्वतिर थंब होत नव्हते, अशा तक्रारी वाढल्या होत्या. मशीनमधील त्रुटींमुळे धान्य वितरण प्रणाली विस्कळित झाली होती. या कारणावरून ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात वादही झाले आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी पुरवठा विभागाने दुरुस्ती करून पुन्हा त्या मशीन चालविण्यास सांगितल्या. मात्र, या मशीनचा बिघाड काही संपेना, अशी परिस्थिती निर्माण झाली. नवीन मशीन देण्याची मागणी दुकानदारांनी केली. त्यांच्या मागणीची दखल घेत फोरजी ई-पॉस मशीन देण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यात सुमारे एक हजार 300 दुकानदारांना मशीन देण्यात आली. या मशीनद्वारे आता धान्य वितरण करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. ही मशीन अगोदरच्या मशीनपेक्षा मोठी असून, त्यामध्ये थंब आणि आय स्कॅन पद्धतदेखील असल्याची माहिती समोर येत आहे.
ग्राहकांना ताटकळत राहावे लागणार नाही या मशीनमुळे स्वस्त धान्य वितरण करताना येणाऱ्या अडचणींवर मात करता येणे शक्य होणार आहे. ग्राहकांची होणारी धान्य घेण्यासाठी गर्दी आणि लांबच लांब रांग आता काही अंशी कमी हाणार आहे.
फोर जी मशीन आल्यामुळे दुकानामध्ये काम करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. आधीच्या मशीन टू जी तंत्रज्ञानावर आधारित होत्या, त्यातच टूजी तंत्रज्ञान जवळपास बंद झालं होतं. त्यामुळे धान्यवाटपाची गती कमी होती. त्यामुळे धान्य वाटपात अडचणी यायच्या. आता आपल्याकडे आयआरआयएस नावाचे स्कॅनरही उपलब्ध असून, ज्याच्या अंगठ्याचे ठसे उमटत नाहीत, त्यांच्या डोळ्यांच्या बुबुळांचे फोटो घेऊनही आता धान्य वितरणाची व्यवस्था आहे. त्यामुळे निश्चित धान्य वितरण करणे सोपे होणार आहे.
कौस्तुभ जोशी, तालुका सचिव,
रेशन दुकानदार संघटना
फोर जी मशीनविषयी या मशीनमध्ये पाच हजार मेगा क्षमतेची बॅटरी आहे. तसेच, या मशीनमध्ये दोन सीम कार्ड असणार आहेत. एक वोडाफोन किंवा एअरटेल आणि दुसरे जिओचे असणार आहे. हे मशीन पूर्णपणे भारतीय बनावटीचे असणार आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये एकूण 1443 रास्त भाव दुकाने आहेत. एकूण शिधापत्रिकांची संख्या चार लाख 58 हजार 923 असून, एकूण लाभार्थींची संख्या 17 लाख 55 हजार 509 आहे. जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या 83 हजार 504 असून, लाभार्थींची संख्या दोन लाख 57 हजार 313 आहे.