कैद्यांसाठी ई- मुलाखत ठरतेय फायदेशीर

कारागृहात बसून थेट नातेवाईकांशी साधता येतो संवाद


। अलिबाग । प्रमोद जाधव ।

कैद्यांना भेटायला येणार्‍या नातेवाईकांना आता कारागृहात येण्याची गरज नाही. ई मुलाखतीच्या माध्यमातून कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत कधीही संवाद साधता येत आहे. संगणकाच्या एका क्लीकवर नातेवाईकांशी कैद्यांना ई- मुलाखतीद्वारे भेटण्याबरोबरच मनमोकळे बोलता येते. जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे कालीन वास्तूमध्ये अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा कारागृह गेल्या अनेक वर्षापासून आहे. या कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांतील कैद्यांना ठेवले जाते. 80 पुरुष व दोन महिला कैदी राहतील इतकी या कारागृहाची क्षमता आहे. परंतु वाढत्या गुन्हेगारीमुळे या कारागृहात 180 पुरुष व 10 महिला असे एकूण 190 कैदी राहत आहे. या कैद्यांवर लक्ष ठेवण्याचे काम कारागृह अधीक्षक अशोक कारकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. कैद्यांच्या प्रत्येक संशयीत हालचालीवर लक्ष ठेवण्याबरोबरच कैद्यांमध्ये सुधारणा निर्माण करण्याचे कामही वेगवेगळ्या उपक्रमांमधून केले जाते. कैद्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक कारागृहात येतात. कैद्यांना भेटण्यासाठी अर्ज भरणे. त्यानंतर कारागृहात देणे, वरिष्ठांची मान्यता घेणे ही लांबणीची प्रक्रीया कैद्यांच्या नातेवाईकांना डोकेदुखी ठरत राहिली आहे. त्यामुळे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृहात ई मुलाखतीची व्यवस्था करण्यात आली.

कारागृहात संगणकाची व्यवस्था करण्यात आली. कारागृहाच्या नावाची एक लिंक ओपन केली जाते. कारागृहाच्या अधिकार्‍यांकडून मान्यता मिळाल्यावर ती लिंक ओपन करून कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत बोलण्याची संधी दिली जाते. या ई- मुलाखतीमुळे कामाच्या वेळी कैदी कधीही त्यांच्या नातेवाईकांसोबत ऑनलाईन पध्दतीने बोलू शकतात. त्यांच्याशी संवाद साधू शकतात. कैद्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ, वेळ व पैसा बचत होण्यासाठी ई- मुलाखत फायदेशीर ठरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ई- मुलाखतीमार्फत कैदी त्यांच्या नातेवाईकांसोबत कमीत कमी पंधरा मिनीट बोलतात.

कारागृहातील कैद्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ई- मुलाखतीमुळे  कैदी त्यांच्या नातेवाईक ऑनलाईन पध्दतीने संवाद साधू शकतात. ही व्यवस्था फारच उपयोगी ठरत आहेत. कैदी कारागृहात बसून बाहेर असलेल्या नातेवाईकांशी बोलत असल्याने कारागृहात येण्याचा वेळही नातेवाईकांचा वाचत आहे


अशोक कारकर – अधीक्षक
जिल्हा कारागृह, रायगड
Exit mobile version