स्थानिक व पर्यटक संतप्त
| माथेरान | प्रतिनिधी |
दस्तुरी नाका ते माथेरान रेल्वे स्टेशन या अल्प अंतरासाठी ई-रिक्षा सेवा उपलब्ध असली तरी चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. दुहेरी भाड्याची अपेक्षा, अपुरी सेवा आणि प्राधान्यक्रमातील गैरप्रकार यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माथेरानमध्ये दस्तुरी नाका ते रेल्वे स्टेशन या सुमारे अडीच किलोमीटर अंतरासाठी ई-रिक्षा सेवा सुरू असली, तरी सध्या या सेवेत अनेक त्रुटी समोर येत आहेत. प्रति प्रवासी 35 रुपये असा दर आकारला जात असून, या मार्गावर रिक्षा चालकांना दररोज दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे सांगितले जाते.
सद्यःस्थितीत सुमारे 20 ई-रिक्षा उपलब्ध असल्या तरी प्रत्यक्षात केवळ सात ते आठ रिक्षाच नियमितपणे सुरू असतात. काही रिक्षा दुरुस्तीत तर काही चार्जिंगसाठी बंद असल्यामुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
याशिवाय, दस्तुरी नाका आणि रेल्वे स्टेशन या दोन्ही ठिकाणी प्रवासी वाट पाहात असताना रिक्षा चालक रिकाम्या येण्यास तयार नसून दोन्ही बाजूंनी भाडे मिळावे, अशी त्यांची भूमिका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना उन्हात उभे राहून रिक्षांची वाट पाहावी लागत आहे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन मोफत सेवा पुरवली जात असल्यामुळे सामान्य प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी ई-रिक्षा चालकांनी प्रवाशांना वेठीस धरणे थांबवावे, अशी मागणी केली असून, पर्यटकांनीही या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.






