। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात येणार्या पर्यटकांची संख्या पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर कमालीची वाढली आहे. त्यात माथेरान शहरातील सर्व शाळांचे वेळापत्रक लक्षात घेता पर्यटकांना ई-रिक्षा उपलब्ध होत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन माथेरान शहरात सर्व हात रिक्षा चालकांना ई-रिक्षा चालवण्याची परवानगी देण्याची मागणी आणि हात रिक्षा संघटनेच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय माथेरानच्या माजी नगराध्यक्षा दिव्या डोईफोडे यांनी केली आहे.
ई-रिक्षा हा माथेरान शहरातील स्थानिक आणि पर्यटकांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. दस्तुरीनाका टॅक्सी स्टँड येथून ते थेट माथेरान गावात अत्यंत स्वस्तात आणि वेगाने प्रवास होत असल्यामुळे पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. ही वाढ लक्षात घेता ई-रिक्षाच्या संख्येत वाढ होणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांचे आहे. सध्या शहरात असलेले 20 ई-रिक्षांपैकी 15 ई-रिक्षा या माथेरानमधील तीन शाळेतील विद्यार्थ्यांना सेवा देत आहेत. त्यात तिन्ही शाळांचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याने अवघ्या पाच ई-रिक्षाच नागरिकांच्या सेवेत असतात. त्यामुळे नागरिकांना तासनतास वाट पहावी लागते. त्यामुळे माथेरान शहरात वाढलेले पर्यटक निर्माण होणारा व्यवसाय लक्षात घेऊन शासनाने ई-रिक्षांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष डोईफोडे यांनी केली आहे.
त्यासाठी माथेरान सनियंत्रण समितीने पुढील बैठक ही माथेरान शहरात घेण्यात यावी. जेणेकरून माथेरान मधील लहान व्यवसायिक, व्यवसायिक, दुकानदार, येणारे पर्यटक यांच्या बाजू समजून घ्याव्यात, अशी सूचना केली आहे. तसेच, येत्या 14 एप्रिलपासून माथेरानमध्ये ई-रिक्षाच्या श्रमिक रिक्षा संघटनेने बेमुदत उपोषणाचा इशरा दिला आहे. त्या बेमुदत उपोषणाला देखील दिव्या डोईफोडे यांनी पाठिंबा दिला आहे.