। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन वर दिवाडकर कॅन्टीन होते. प्रवासी वर्गाला काही खाद्य पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी उभारण्यात आलेले दोन्ही कॅन्टीन गेली दोन वर्षे बंद स्थितीत आहेत. दरम्यान, नेरळ स्थानकाचा मेकओव्हर होत असताना त्या बंद असलेल्या खानसामा कॅन्टीन कालबाह्य होण्याची भीती प्रवाशी वर्गाला लागली आहे. त्यात फलाट एकवर अशी कोणतीही व्यवस्था आजतागायत उभारण्यात आलेली नाही.
कोरोना काळापासून नेरळ रेल्वे स्थानकातील कॅन्टीन बंद झाली आहेत. त्या दोन्ही कॅन्टीनमधून मिळणारी खानसामा सेवा बंद झाली असून आता प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या दिवाडकर कॅन्टीन या कायमच्या विस्मृतीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थनाकात सध्या अनेक विकासकामे सुरु असून बंद असलेल्या कँटीनचे फलक देखील रंगरंगोटीत पुसले जात आहेत. त्यामुळे नव्याने नेरळ स्थानकात येणार्या प्रवाशांना त्या ठिकाणी खानसामा होता हे देखील समजून येणार नाही. प्रवाशाच्या सोयीसाठी नेरळ प्रवासी संघटनेने देखील आवाज उठवण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.