ई-रिक्षा प्रकल्प माथेरानसाठी फायदेशीर

राज्य सरकारचा अहवाल तयार

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या शहरात वाहतुकीचे साधन म्हणून पर्यावरण पूरक ई-रिक्षाचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने तीन महिन्यांचा पायलट प्रकल्प पूर्ण केला असून, त्याचा अहवाल राज्य सरकार कडून सनियंत्रण समितीला सादर करण्यात आला आहे. सनियंत्रण समितीच्या 12 एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत काही हरकती सूचना यांच्या दुरुस्ती नंतर सदर अहवाल मंजूर होणार आहे. हा अहवाल समितीकडून सर्वोच्य न्यायालयात सादर होणार आहे, मात्र हा अहवाल माथेरान मध्ये ई-रिक्षासाठी पाठिंबा देणार्‍या समुहासाठी फायदेशीर असल्याचे बोलले जात आहे.

पर्यटक, विद्यार्थ्यांना उपयुक्त
ई-रिक्षाच्या पायलट प्रकल्पामधील तीन महिन्याच्या कालावधीत 19,188 शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवाशी 33,058 तर 18,833 पर्यटकांनी असा एकूण 51,891 प्रवासी यांनी ई-रिक्षामधून प्रवास केला आहे. पालिकेला त्यासाठी माथेरान पालिकेला 1,92,778 एवढे उत्पन्न मिळाले आहे. पर्यटकांची संख्या 2,08,350 पोहोचली. त्यामध्ये विद्यार्थी 26.99% स्थानिक रहिवाशी 46.50% टक्के आणि पर्यटक 26.49% वापर झाला आहे. 4.51% पर्यटकांनी या काळात ई-रिक्षाचा वापर केल्यास सिद्ध झाले आहे. त्याचवेळी या तीन महिन्यांचे कालावधीत ई-रिक्षााच्या पायलट प्रोजेक्ट दरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवली नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ई-रिक्षाचा उपयोग स्थानिक रहिवाशी पर्यटक शालेय विद्यार्थी, दिव्यांग आणि रुग्णांना यांच्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. माथेरान मधील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना त्यांनी रिक्षा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. शासनाची रुग्णवाहिका 108 चे काम पाहणारे वैद्यकीय अधिकारी यांनी देखील ई-रिक्षा ही माथेरान मधील रुग्णांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरली आहे, असा अहवाल त्यांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयाला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

वन ट्रि हिल ते दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड हे अंतर सहा किलोमीटर इतके आहे. हे अंतर ई-रिक्षामुळे वन ट्रि हिल विभागातील नागरिकांना अवघ्या काही मिनिटांत पार करता येत होते. माथेरान येथे सर्व प्रकारच्या वस्तूंची वाहतूक हातगाडी आणि घोड्यांवरून केली जाते. जीवनावश्यक वस्तूंची ने आण करताना अनेक अडचणी येत असतात आणि त्यासाठी मोठा खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी माथेरान मध्ये भविष्यात ई-टेम्पो सारखी वाहतूक व्यवस्था सुरू झाल्यास स्थानिक रहिवाशांना यांना आणि बांधकाम ठेकेदार यांना ते साहित्य आणणे आणखी सुलभ होईल. ई-टेम्पोमुळे वाहतूक सुलभ आणि स्वस्तात होईल, तसेच शहरातील विकासाची कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील ,असा अहवाल शासनाकडून सनियंत्रण समिती पुढे ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version