ई-रिक्षा सेवा कायमस्वरूपी सुरू राहावी; ज्येष्ठ नागरिकांची मागणी

| माथेरान | वार्ताहर |

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरान नगरपालिकेने दि. 5 डिसेंबरपासून ई-रिक्षाच्या पायलट प्रोजेक्टला सुरुवात केली आहे. या सुरू झालेल्या ई-रिक्षांमुळे ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली आहे. दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने ज्येष्ठ नागरिकांची अक्षरशः दमछाक व्हायची; परंतु सद्यःस्थितीत ई-रिक्षाच्या महत्त्वपूर्ण सेवेमुळे दहा मिनिटात माथेरान गावात यायला मिळते. याच मुख्य स्वस्त आणि सुरक्षित वाहतूक सेवेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक वाहतुकीचा सुखद अनुभव घेत आहेत.

भविष्यात ही सेवा अशीच कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिभाई मेहता, उपाध्यक्ष अनंता शेलार, अशोक पवार, रमेश जोशी, शफिक भाई शेख यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांची नगरपरिषदेच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. राज्य सरकारने कोर्टाला अहवाल सादर करताना ज्येष्ठ नागरिकांची मागणी प्रामुख्याने मांडावी अशी मागणी हरिभाई मेहता यांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version