माथेरानमध्ये ई-स्कुटर; अश्‍वपालकांमध्ये नाराजी

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मध्ये सध्या ई-रिक्षाचा तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्ट सुरू असताना माथेरान शहरात एका पर्यटकाने ई-स्कूटर फिरवल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचवल्या असून, अश्‍वपालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माथेरान सारख्या प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळी रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळता शहरात इंधनावर चालणार्‍या वाहनांसह इतर वाहनांना पूर्णपणे बंदी असून अनेक वर्षा च्या संघर्षानंतर न्यायालयाने प्रायोगिक तत्वावर ई-रिक्षा वापरण्यास परवानगी दिली आहे. येथे ई-रिक्षाला परवानगी असली तरी इतर बॅटरीवर चालणार्‍या कोणत्याही प्रकारच्या वाहनांना मात्र अजिबात परवानगी नसताना आत्ताच दोन दिवसांपूर्वी पुणे येथील एका पर्यटकाने आपली ई-स्कुटर थेट माथेरान शहरात आणली.सध्या येथे सुरू असलेल्या ई-रिक्षाच्या विरोधातील संघर्षांच्या पार्श्‍वभूमीवर अश्या प्रकारची वाहने शहरात येऊन फिरू लागण्याने येथील अश्‍वपालकांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

या ई-स्कुटर घेऊन आलेल्या पर्यटकाबाबत इथल्या अश्‍वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम आणि त्यांच्या संघटनेतील इतर पदाधिकार्‍यांनी या प्रकाराची माहिती दिली.यानुसार संबंधीत पर्यटकाला चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका या ठिकाणी कोणताही सूचना फलक नसल्याने किंवा या संदर्भात कोणीही माहिती दिली नसल्यामुळे अनवधानाने सदर प्रकार घडला असून याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत पर्यटकाने आपली बाजू मांडली.

दरम्यान, शहरात वाहन बंदी असताना अशा कोणत्याही प्रकारचे वाहन भविष्यात शहरात येऊ नये यासाठी येथील प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यासाठी प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्याची सूचना नगरपालिकेला केली असून या प्रकरणात संबंधित पर्यटकाने मायक्रोमोबिलिटी प्रकारातील ई-स्कूटर शहरात फिरवल्याने वाहनबंदी कायद्याचे उल्लघन केल्यामुळे त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी सांगितले.

Exit mobile version