माथेरानमधील प्रदूषणाला बसणार आळा; मालवाहतूकही स्वस्त होण्याची शक्यता
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानच्या पर्यावरणासाठी डोकेदुखी ठरत असलेल्या घोड्यांच्या लिदीचा प्रश्न आणि वाढती मालवाहतूक यावर ई-टेम्पो हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. घोड्यांची लिद वाहून नेण्याबरोबरच मालवाहतुकीसाठी ई-टेम्पोचा वापर वाढल्यास माथेरानमधील घोड्यांची संख्या कमी होऊन लिदीचे प्रमाण तब्बल 30 टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच मालवाहतूकही तुलनेने स्वस्त होऊ शकते.
माथेरानमधील घोड्यांच्या लिदीमुळे प्रदूषण वाढत असून, पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे आणि केतन रामाणे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ, लोणेरे-माणगाव यांच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर घोड्यांच्या लिदीचा शास्त्रोक्त अभ्यास केला. या पाहणीत माथेरानचे पाणी, हवा आणि माती प्रदूषित असल्याचे निष्पन्न झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. घोड्यांची संख्या कमी करणे, तबेले माथेरानच्या पर्यावरण क्षेत्राबाहेर हलविणे, घोड्यांसाठी मार्ग निश्चित करणे तसेच लिदीवर प्रक्रिया करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या 54 पानी प्रतिज्ञापत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठातील माथेरानच्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करणारे प्राध्यापक हे तज्ज्ञ असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. वर्निका बजाज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ॲड. मानसी जोशी, तर माथेरान नगरपरिषदेच्यावतीने ॲड. प्रिया गोंधळेकर यांनी बाजू मांडली.
पालिकेच्या प्रतिज्ञापत्रावर लवादाची नाराजी
याचिकेवरील गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश दिनेशकुमार सिंग यांनी माथेरान नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर नाराजी व्यक्त केली. लवादाने दि. 9 जूनच्या आदेशात घोड्यांची संख्या कमी करणे, तबेले स्थलांतरित करणे, घोड्यांचे मार्ग निश्चित करणे आणि लिदीवर प्रक्रिया करण्याबाबत पालिका कोणती कार्यवाही करणार, याची सविस्तर माहिती मागितली होती. मात्र, नगरपरिषदेने केवळ ई-टेम्पोची मागणी केल्याचे निदर्शनास आले. घोड्यांच्या माध्यमातून होणारी मालवाहतूक आणि लिद वाहून नेण्यासाठी ई-टेम्पो हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. त्यातून घोड्यांची संख्या कमी होण्यासही मदत होऊ शकते. मात्र, लवादाने पालिकेला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र नव्याने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
