70 महिला बचतगटांनी केली 2 कोटी 89 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल
| रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील 70 महिला बचतगटातील महिलांनी उमेद अभियान अंतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवले आहे. या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. बचत गटातील महिलांनी सुमारे 35 हजार गणपती मूर्ती तयार केल्या असून, यामधून त्यांनी 2 कोटी 89 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल केली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने, जिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुड झेप घेऊ शकल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणपती मूर्तींना स्वतची खास ओळख प्राप्त झाली असून, गणपती मूर्तींना गणेशमूर्तीना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचतगट उतरले आहेत.
ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पेण तालुक्यात जिल्हा परिषद दादर गटामध्ये प्रहार महिला प्रभाग संघाची स्थापना केली असून, यामध्ये 17 ग्राम संघांचा समावेश आहे. या ग्रामसंघात 441 महिला बचतगट जोडलेले असून, त्यापैकी 70 बचत गटातील महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी सुमारे 35 हजार गणपती मूर्ती तयार केल्या असून, यामधील 1 हजार 500 गणपती मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. गणपती मूर्ती व्यवसायातून महिला बचत गटांनी 2 कोटी 89 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल केली आहे. व्यवसायासाठी उमेद अभियान मार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला असून, महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर मधील महिलांनी घेतले प्रशिक्षण
पेण मधील महिला बचत गटांचा गणपती मूर्ती व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बचतगटातील महिलांचि अभ्यास दौरा काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 100 महिला सहभागी होत्या. या महिलांनी गणपती मूर्ती आखणी, बांधणी रंगकाम याचे प्रशिक्षण घेतले.