2 कोटी 60 हजार रुपयांच्या निधीची गरज
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
जूलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत दोन कोटी 60 लाख 43 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात शासनाला पाठविला आहे. महिन्याभरापासून शासनाच्या कार्यालयात हा प्रस्ताव पडून आहे. या भरपाईची प्रतिक्षा नुकसानग्रस्तांना लागून राहिली आहे. ही भरपाई कधी मिळणार, असा सवाल नुकसानग्रस्तांकडून व्यक्त केला जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सात जूलैला पावसाने जोरदार सुरुवात केली. जूलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरुच राहिला. वादळी वार्यासह मुसळधार पाऊस जिल्ह्यामध्ये कोसळला. या पावसात भात पिकाचेदेखील प्रचंड नुकसान झाले. भात लागवडीसाठी असलेली रोपे पाण्यात वाहून गेली. काही रोपे कुजून गेली. काही शेतकर्यांच्या शेतातील बांध फुटले, घरांची पडझड झाली. तसेच पाळीव जनावरांचादेखील मृत्यू झाला.
जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानीची पंचनामे तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्या मदतीने करण्यात आला. त्याचा अहवाल तालुका स्तरातून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. जिल्ह्यात 573 गावांतील दोन हजार 194.72 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले. 650 घरांची पडझड झाली. त्यात काहींच्या घरांची पुर्णतः तर काही घरांच्या भिंती कोसळून हानी झाली. त्यामुळे अनेकजण बेघर झाले. 11 पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. मागील महिन्यात 11 ऑगस्टला शासनाला हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. परंतु एक महिना होण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीदेखील शासनाकडून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली नाही. शासनाच्या कार्यालयात हा प्रस्ताव धुळखात पडून आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना भरपाईची प्रतिक्षा लागून राहिली आहे. शासन वेगवेगळ्या योजनांच्या जाहीरातीमध्ये मशगूल असल्याने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याची चर्चा जोरात रंगत आहे. भरपाई लवकर मिळेल अशी नुकसानग्रस्तांना आशा होती. परंतु आणखी भरपाईसाठी किती दिवस वाट पहावी लागणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नुकसानीवर दृष्टीक्षेप
नुकसान झालेली शेती - दोन हजार 194.72 हेक्टर
निधी - एक कोटी 90 लाख 45 हजार रुपये
नुकसान झालेली घरे - 650
निधी - 65 लाख 56 हजार रुपये
मृत जनावरे - 11
निधी - चार लाख 42 हजार रुपये