मिश्र दुहेरी संघाने पटकाविले रौप्यपदक
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताने एशियन गेम्स 2023 च्या सातव्या दिवशी रौप्यपदकाने सुरूवात केली. भारताच्या दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी संघाने भारताला 13 वे रौप्यपदक पटकावून दिले. या संघात सरबजोत सिंग आणि दिव्या यांचा समावेश होता. सुवर्णपदकाच्या सामन्यात त्यांना चीनच्या जोडीला पराभूत करता आले नाही. सरबजोत आणि दिव्याने 14 गुण मिळवले, तर चीनच्या संघाने 16 गुण मिळवले.
सुवर्णपदकाचा सामना सुरू झाला त्यावेळी भारताची जोडी सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी 4 गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी चीनविरूद्ध ही आघाडी 7-5 अशी नेली. मात्र, मायदेशात खेळणाऱ्या चीनच्या जोडीने ही पिछाडी भरून काढत भारताला कडवी झुंज दिली. अखेर त्यांनी अटीतटीचा झालेला सामना 16-14 असा जिंकत सुवर्णपदकावर कब्जा केला. भारतीय नेमबाजांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
या रौप्यपदकानंतर भारताने आपली पदक संख्या ही 34 वर नेली आहे. भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्यपदके अशी एकूण 34 पदके जिंकली आहेत. भारत सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.







