बीसीसीआयमध्ये पुन्हा भूकंप

ऍबे कुरुविला यांनी दिला राजीनामा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या अफरातफर माजली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सातत्याने होणार्‍या वादामुळे चर्चेत आहे. भारतीय कर्णधार पदाचा वाद अद्याप पूर्णपणे संपला नसतानाच, आता आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. भारताच्या वरिष्ठ संघाच्या निवड समिती सदस्य असलेले ऍबे कुरुविला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी नव्या सदस्याची नियुक्ती करण्यासाठी बीसीसीआय नवीन जाहिरात देणार आहे.

कुरुविला हे निवड समितीमध्ये पश्‍चिम विभागाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांची 2020 मध्ये निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना निवड समितीमध्ये काम करताना पाच वर्ष झाले होते. त्यापूर्वी, ते चार वर्षे ते कनिष्ठ संघाच्या निवड समितीचे प्रमुख होते. त्यांनीच निवडलेल्या संघाने 2012 मध्ये एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्‍वचषकात विश्‍वविजेतेपद पटकावले होते. मात्र, नव्या नियमानुसार निवड समितीमध्ये कोणताही सदस्य पाच वर्षापेक्षा अधिक काम करू शकत नाही. मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी जानेवारी महिन्यात या संदर्भात तक्रार केली होती. त्यावर कारवाई करत बीसीसीआयने कुरुविला यांना राजीनामा सुपूर्द करण्यास सांगितले. बीसीसीआयला हा नवा नियम माहित नसल्याचे दिसून आले आहे.

भारतीय संघाचे केले होते प्रतिनिधित्व
आपल्या क्रिकेट कारकिर्दीत वेगवान गोलंदाज असलेले कुरुविला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करत. भारतीय क्रिकेटमधील सर्वात शिक्षित क्रिकेटपटू म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10 कसोटी व 25 वनडे सामने खेळले आहेत. बीसीसीआय आता त्यांच्यावर नवी जबाबदारी देऊ शकते. धिरज मल्होत्रा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले जनरल मॅनेजर (स्पोर्ट्स डेव्हलपमेंट) हे पद कुरुविला यांना बहाल केले जाऊ शकते.

Exit mobile version